LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

भरधाव ‘आपली बस’ने पादचाऱ्याला चिरडले, एकाचा मृत्यू

अजनी चौकात भीषण अपघात, मेट्रो पिलरला धडकून महिला वाहक जखमी, चालक अटकेत
नागपूर:
अजनी चौकात रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भरधाव ‘आपली बस’ने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला चिरडले. या अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. धडकेनंतर नियंत्रण सुटलेली बस थेट मेट्रो स्थानकाच्या खांबावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की बसच्या समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
राजीव महेंद्रलाल शाह (वय ५६, रा. गजराज हाइट्स, तात्या टोपे नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे राजीव शाह रविवारी सकाळी धंतोलीतील अजित बेकरीसमोरून मॉर्निंग वॉक करत होते. त्याच वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ‘आपली बस’ने (क्रमांक एमएच ४० डीसी ७४३२) प्रथम पायी जाणाऱ्या शाह यांना जोरदार धडक दिली आणि त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस मेट्रोच्या पिलरला जाऊन धडकली.
या अपघातात बसच्या महिला वाहक वैशाली चौधरी यादेखील गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या शाह यांना डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. ही बस नागपूरहून बुटीबोरीकडे जात होती. अपघातानंतर बसचालक शेख रियाज शेख चांद कुरेशी (वय ३९) हा वाहन घटनास्थळीच सोडून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून, पसार झालेल्या चालक रियाज शेख याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह:
प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांच्या मते, अजनी चौक परिसरात अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे वाहनचालकांना या भागातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते आणि अनेकदा वाहने एकमेकांना धडकण्याच्या घटना घडतात. यापूर्वीही महापालिका परिवहन विभागांतर्गत धावणाऱ्या ‘आपली बस’च्या अपघातांत अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. गेल्या काही महिन्यांत डझनभर अपघात होऊनही मनपा प्रशासन या अपघातांना आळा घालण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *