उदमांजराच्या तीन पिल्लांची शिकार; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, ६ शिकाऱ्यांना बेड्या!
कामठा नवरगाव नदी पुलाजवळ सापळा : टोकदार भाले, तीन मृत उदमांजरे आणि मुंगुसाचे केस जप्त
गोंदिया : गोंदिया वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कामठा सहवनक्षेत्रातील मौजा कामठा-नवरगाव नदी पुलाजवळ सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) सकाळी ७ वाजेच्या सुमारास वनविभागाने धडक कारवाई करत वन्यप्राणी उदमांजराची शिकार करणाऱ्या सहा शिकाऱ्यांच्या टोळीला रंगेहाथ अटक केली. या कारवाईत आरोपींकडून उदमांजराची तीन मृत पिल्ले, शिकारीसाठी वापरलेले लोखंडी टोकदार भाले तसेच वन्यप्राणी मुंगुसाचे केस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, गोंदिया सहवनक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक एम. डब्ल्यू. भांडारकर हे आपल्या अधिनस्थ बीटरक्षकांसह १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास नियमित गस्तीवर होते. दरम्यान, कामठा-नवरगाव नदी पुलाजवळ तीन इसम हातामध्ये काठ्या घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना त्यांना दिसले. या काठ्यांना लोखंडी टोकदार सुऱ्या बसविल्याचे निदर्शनास आल्याने वनअधिकाऱ्यांनी तात्काळ जवळ जाऊन त्यांची झडती घेतली. यावेळी त्यांच्याकडे शिकारीसाठी वापरण्यात येणारे टोकदार भाले आणि सोबत असलेल्या पिशवीत संरक्षित वन्यप्राणी ‘उदमांजर’ (Civet Cat) जातीची ३ पिल्ले मृत अवस्थेत आढळून आली.
घटनास्थळावरून आणखी तिघांना अटक; मुंगुसाचे केस जप्त
प्राथमिक चौकशीनंतर वनपथकाने घटनास्थळी जाऊन सखोल तपासणी केली असता, या शिकारी प्रकरणात सामील असलेले आणखी तीन आरोपी जाळ्यात अडकले. त्यांच्या ताब्यातून वन्यप्राणी मुंगुसाचे केसही जप्त करण्यात आले आहेत. अशाप्रकारे या प्रकरणात एकूण ६ आरोपींना वनविभागाने ताब्यात घेऊन अटक केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन व दहन
या घटनेनंतर कुडवा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एच. शेंद्रे व त्यांच्या पथकाला गोंदिया वनपरिक्षेत्र कार्यालयात पाचारण करण्यात आले. कार्यालय परिसरात मृत उदमांजराच्या तिन्ही पिल्लांचे रीतसर शवविच्छेदन (Post-mortem) करून नियमानुसार त्यांचे दहन करण्यात आले.
या प्रक्रियेदरम्यान गोंदिया वनविभागाचे उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्पा) विजय धांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) प्रशांत हुमणे, मानद वन्यजीव रक्षक नूर अली सैय्यद, मुकेश निवांते आणि मुकुंद धुर्वे प्रामुख्याने उपस्थित होते.
वनपथकाच्या सतर्कतेचे कौतुक
सदर यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विजय धांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत हुमणे, क्षेत्र सहाय्यक एम. डब्ल्यू. भांडारकर, वनपाल डॉली कटरे, वनपाल कु. एच. पी. कापगते, वनरक्षक एम. एन. मेहर, आर. व्ही. चंदेल, एस. जी. बेर, वाहनचालक सागर लोहित, एच. व्ही. महारवाडे, जी. पी. चौधरी, पी. आर. नायकरे तसेच गोंदिया व तिरोडा येथील संपूर्ण आरआरटी (RRT) पथकाने पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास वनविभागाकडून सुरू आहे.

