त्या नरभक्षी वाघाचा धुमाकूळ; दहशतीचे वातावरण
सात महिन्यांत पाच जणांचा बळी
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात (melghat tiger reserve ) नरभक्षी वाघाने पुन्हा एकदा हल्ला करून व्याघ्र प्रकल्पात रोजंदारीने काम करणाऱ्या मजुराचा बळी घेतला. प्रेम मुन्ना कास्देकर हा मजूर राजदेव बाबा कॅम्पवर गस्ती दरम्यान कर्तव्य बजावत असताना वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. गेल्या पाच महिन्यांत सात नागरिकांना प्राण गमवावे लागले असून ही घटना मेळघाटातील (melghat tiger reserve ) जनतेसाठी भीषण धक्का ठरली आहे. या नरभक्षी वाघाने सोळा दिवसांच्या आत दोन हल्ले केले आहेत. अवघ्या सोळा किलोमीटरच्या परिसरात दुसरी शिकार झाल्याने हा वाघ अधिक आक्रमक होत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. परिसरातील आदिवासी बांधव व वनकामगार भीतीच्या छायेत जगत असून शेतात जाणे, जंगलात लाकूड आणणे वा गस्तीची कामे करणेही जिवावर बेतत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प (melghat tiger reserve ) हा देश-विदेशातून लक्ष वेधून घेणारा जैवविविधतेचा खजिना आहे; मात्र येथेच स्थानिकांची सुरक्षितता वारंवार धोक्यात येत आहे. एकीकडे ‘व्याघ्र संवर्धन’ या नावाखाली प्रकल्पाला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो, तर दुसरीकडे त्या व्याघ्र प्रदेशात राहणारे मूळ नागरिक व कामगार यांचे प्राण वाऱ्यावर सोडले जात आहेत, ही प्रशासनाची ढोंगी व निष्क्रिय भूमिका उघड करते.
फक्त नुकसानभरपाईवरच भर
व्याघ्र प्रकल्प प्रशासनावर नागरिकांचा आक्रोश ओसंडून वाहत आहे. अधिकारी मृत्यूनंतर केवळ काही आर्थिक मदत जाहीर करून जबाबदारी झटकतातः मात्र प्रत्यक्ष ठोस उपाययोजना कुठेच दिसत नाहीत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नरभक्षी वाघाचा बंदोबस्त, सुरक्षित गस्तीसाठी शस्त्रसज्ज पथके, तसेच प्रभावित गावांमध्ये लोकजागृती या उपाययोजना केवळ कागदावर मर्यादित राहिल्याची तक्रार सातत्याने केली जात आहे.

