NDRF Gondia : आपत्ती व्यवस्थापनाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व : जिल्हाधिकारी प्रजित नायर
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती
गोंदिया : आपात्कालीन परिस्थितीमध्ये प्रभावीपणे समस्यांचे निराकरण करता यावे, म्हणून आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज बनलेली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमात केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात (ता.8) आपत्ती व्यवस्थापन बाबतचे प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. (NDRF) यावेळी परिविक्षाधीन आय.ए.एस. अधिकारी साईकिरण नंदाला, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) ज्योती कांबळे, अधीक्षक धनंजय देशमुख, एनडीआरएफ चमू नागपूरचे प्रमुख ब्रिजेशकुमार यादव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे व जिल्हा शोध व बचाव पथकाचे प्रमुख नरेश उईके उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, आपत्ती दरम्यान गरजूंना तात्काळ मदत पुरविण्यासाठी प्रशासन नेहमीच तत्परतेने कार्य करीत असते. आपत्ती काळात नागरिकांचा देखील प्रतिसाद प्रशासनाला लाभते. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत, त्यामुळे विद्यार्थी जीवनात आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष महत्त्व आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे जिवित व वित्तीय हानी टाळण्यासाठी जिल्ह्यातील विविध महाविद्यालय व तालुका स्तरावर प्रशिक्षण, जनजागृती व रंगीत तालिम कार्यक्रम राबविण्याकरीता समादेशक (होमगार्ड) व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) नागपूर यांची चमु दिनांक 8 ते 12 डिसेंबर 2025 पर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम राबविणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापन बाबतचे प्रशिक्षण आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) नागपुरचे पोलीस निरीक्षक ब्रिजेश कुमार यादव म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपत्तींचा धोका कमी करण्यासाठी, आपत्तीच्या काळात प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी आणि त्यानंतरच्या नुकसानीतून सावरण्यासाठी एक पध्दतशीर प्रक्रिया आहे. ज्यात आपत्तीपूर्व नियोजन म्हणजे जोखीम मूल्यांकन व तयारी. प्रतिसाद म्हणजे बचाव व मदत आणि पुनर्प्राप्ती म्हणजे पुनर्वसन या टप्प्यांचा समावेश होतो. पुरामध्ये वाहून गेलेल्या नागरिकांना रेस्क्यू करुन बाहेर कसे काढले जाते, एखाद्या इमारतीत आग लागल्यावर आपल्याला आतमध्येपण जाता येत नाही व आतमधून बाहेरपण निघता येत नाही, अशावेळी आपण काय उपाययोजना केली पाहिजे, आपल्या घरात सिलेंडरचा स्फोट अथवा कुकरचा स्फोट झाल्यावर आपण काय उपाययोजना करावी याबाबत त्यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिकेद्वारे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास एम.बी.बी.एस. प्रथम वर्षाचे 130 विद्यार्थी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पहिल्यांदाच जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरुन रोपवेच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करुन आपातकालीन काळात कशी मदत घेतली जाऊ शकते हे दाखविले.

