माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या दीपावली मिलन सोहळ्यात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी
नवनिर्वाचित आमदार अभिजीत वंजारी ठरले मुख्य आकर्षण!
गोंदिया : माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दीपावली पर्वानिमित्त नागरिक व कार्यकर्त्यांशी शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यासाठी शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर) भव्य दीपावली मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साही आणि आल्हाददायक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात नागपूर पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ॲड. अभिजीत वंजारी हे विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. या सोहळ्याला काँग्रेससह भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षभेद विसरून हजेरी लावत एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. जीडीसीसी बँकेचे संचालक तथा नगरसेवक प्रफुल अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले.
जिल्हा परिषदेतही काँग्रेसचा अध्यक्ष बसविण्याचा निर्धार : गोपालदास अग्रवाल
उपस्थितांना शुभेच्छा देताना माजी आमदार गोपालदास अग्रवाल म्हणाले की, “गोंदिया आणि येथील जनतेशी माझे रक्ताचे व हृदयाचे नाते आहे. मी आमदार असो वा नसो, जनतेशी जोडलेले हे नाते मी शेवटपर्यंत जपणार असून प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभा राहीन.” देशात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होत असल्याचे सांगत ते म्हणाले की, बॅलेट पेपरवर झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातील ॲड. अभिजीत वंजारी यांच्या ऐतिहासिक विजयाने हे सिद्ध केले आहे की, ईव्हीएमऐवजी बॅलेटवर निवडणुका झाल्यास आजही काँग्रेसच देशातील सर्वोच्च पक्ष म्हणून समोर येईल.
पुढे बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. “गोंदिया नगर परिषदेत सचिन शेंडे यांच्या रूपाने काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला, त्याच धर्तीवर आगामी जिल्हा परिषदेतही काँग्रेस व मित्रपक्षांचा अध्यक्ष निवडून आणणे हेच आमचे मुख्य ध्येय असेल,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
चरखा भेट देऊन नवनिर्वाचित आमदार ॲड. वंजारी यांचा सत्कार
या शुभप्रसंगी माजी आमदार गोपालदास अग्रवाल, आमदार नाना पटोले, खासदार डॉ. नामदेवराव किरसान, खासदार डॉ. प्रशांत पडोले व मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांचा शाल, श्रीफळ आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हस्तनिर्मित चरखा भेट देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना आमदार ॲड. अभिजीत वंजारी म्हणाले की, “नागपूर पदवीधर संघाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि काँटे की टक्कर होती. मात्र, गोपालदास अग्रवाल आणि गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या खंबीर साथीमुळेच हा संघर्षपूर्ण विजय शक्य झाला.” त्यांनी सर्वांचे आभार मानत पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
वैनगंगा-नलगंगा प्रकल्पातून तलाव भरणार : आ. नाना पटोले
आमदार नाना पटोले यांनी गोपालदास अग्रवाल यांच्याशी असलेल्या जुन्या स्नेहाचा उल्लेख करत सांगितले की, विधिमंडळात आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणणे हेच आमचे प्राधान्य राहिले आहे. “गोंदिया हा तलावांचा जिल्हा आहे. जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली वैनगंगा नदी नलगंगा प्रकल्पाशी जोडून जिल्ह्यातील सर्व तलाव पाण्याने तुडुंब भरणे आणि शेतकऱ्यांना सध्याच्या दुष्काळी संकटातून कायमची मुक्ती मिळवून देणे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे ते म्हणाले.
राजकारणापलीकडचा विशाल परिवार : खा. डॉ. प्रशांत पडोले
खासदार डॉ. प्रशांत पडोले म्हणाले की, “गोपालदास अग्रवाल यांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक पक्षात आपली स्वतंत्र व आपुलकीची प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळेच इतर पक्षांतील ज्येष्ठ नेतेही या सोहळ्यात आत्मीयतेने सहभागी होतात.” यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारच्या भूमिकेवर कडाडून टीका केली.
दिग्गजांची उपस्थिती; अपूर्व अग्रवाल यांचे सूत्रसंचालन
या सोहळ्याला खासदार डॉ. नामदेवराव किरसान, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार हेमंत (तानू) पटले, माजी आमदार खोमेश रहांगडाले, माजी जि.प. अध्यक्ष उषा मेढे, नगराध्यक्ष सचिन शेंडे, माजी जि.प. सभापती पी. जी. कटरे, माजी नगराध्यक्ष अशोक इंगले यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वरिष्ठ काँग्रेस नेते अपूर्व अग्रवाल यांनी केले.
मंचावर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अमर वराडे, माजी जि.प. अध्यक्ष ॲड. के. आर. शेंडे, विनोदकुमार जैन (सीए), झामसिंगभाऊ बघेले, माजी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम (बाबा) कटरे, जिल्हा किसान काँग्रेस अध्यक्ष जितेश राणे, राजकुमार (पप्पू) पटले, विजयभाऊ बहेकार, सुरेश चौरागडे, राधेलाल पटले, अरुण दुबे, हुकुमचंद अग्रवाल, प्रफुलबाबू अग्रवाल, गोरेगाव नगराध्यक्ष तेजराम बिसेन, नगरसेवक सुनील भालेराव, पंकज यादव, विजय रगडे, अजय अग्रवाल, चंद्रकुमार चुटे, अमर रंगारी, रूपेश नशीने, दुर्गा तिवारी, बेबीनंदा बंसोड, दीपा सहारे, दीपिका रुसे, क्रांती जायसवाल, ज्योती फुंडे, बंटी कटरे, गंगाधर परशुरामकर, सुरेश अग्रवाल, पन्नालाल सहारे, मनोज पटनायक, जहीरभाई अहमद, माधुरीताई हरिणखेडे, प्रकाश रहमतकर, हरिचंद कावळे, मिथुन पटेल, चमन बिसेन, बंडू शेंडे, रमेश बिसेन, नटवरलाल जैतवार, डॉ. तुलसीराम शिवनकर, टिकाराम भाजीपाले, सुरजलाल महारवाडे, सुरेखाताई भंडारकर, सिद्धार्थ गणवीर, सी. टी. चौधरी, अर्जुन नागपुरे, भास्कर रहांगडाले, गेंदलाल शरणागत, अशोक लिचडे यांच्यासह हजारो नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

