नागझिरा अभयारण्यात नर वाघाचा संशयास्पद मृत्यू
कोअर झोनमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ!
वीज प्रवाहामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज; वन विभागाकडून तपास सुरू!
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या प्रसिद्ध नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये एका पूर्ण वाढ झालेल्या नर वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागझिरा कोअर सहवनक्षेत्रातील थाटेझरी बीट अंतर्गत कक्ष क्रमांक ९९ मध्ये १० नोव्हेंबर रोजी वन कर्मचाऱ्यांच्या सामूहिक गस्तीदरम्यान हा मृतदेह आढळून आला. राखीव वनक्षेत्रातच वाघाचा मृत्यू झाल्याची वार्ता समजताच वन्यजीव वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, वन्यजीव प्रेमींकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
गस्तीदरम्यान उघडकीस आली घटना:
थाटेझरी बीटमधील कक्ष क्रमांक ९९ च्या राखीव वनात नियमित सामूहिक गस्त सुरू असताना वनरक्षक व कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी वाघ निपचित पडलेला दिसला. जवळ जाऊन खात्री केली असता तो मृत असल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना वायरलेसद्वारे माहिती दिली. माहिती मिळताच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पियुष जगताप, नागझिरा खंड गोंदियाचे उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे, सहायक वनसंरक्षक विपीन लांडगे, गस्ती पथक प्रमुख महेंद्र भांगरे आणि नागझिराच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती ए. व्ही. लांबट यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
एनटीसीएच्या (NTCA) नियमावलीनुसार शवविच्छेदन:
राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या (NTCA) प्रमाणित कार्यपद्धतीनुसार (SOP) तातडीने एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली. या उच्चस्तरीय समितीत मानद वन्यजीव रक्षक सांवत बहेकार, एनटीसीए प्रतिनिधी रुपेश निवाते, वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे (WTI) प्रतिनिधी इद्रीस अहमद आणि शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला. या समितीच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पशुवैद्यकीय पथकाने घटनास्थळीच मृत वाघाचे शवविच्छेदन (Post-mortem) केले. प्राथमिक तपासणीमध्ये वाघाचा मृत्यू तीव्र विद्युत प्रवाहाच्या (Electric Current) धक्क्याने झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
सर्व अवयव शाबूत; पंचांसमक्ष दहन:
शवविच्छेदनादरम्यान वाघाची नखे, दात, त्वचा, मिशा यांसह सर्व महत्त्वाचे अवयव पूर्णपणे सुरक्षित आणि शाबूत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अवयवांच्या शिकारीचा उद्देश प्रथमदर्शनी तरी फेटाळण्यात आला आहे. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय नियमांनुसार पंचांसमक्ष वाघाच्या पार्थिवावर विधिवत दहन संस्कार करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी वाघाचे व्हिसेरा नमुने फॉरेन्सिक तपासणीकरिता सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
संरक्षित कोअर क्षेत्रात विद्युत प्रवाह कुठून आणि कसा आला? एखाद्या शेतकऱ्याने शिकारीसाठी कुंपणात वीज प्रवाह सोडला होता का, या दिशेने वन विभागाकडून परिसराची कसून चौकशी सुरू आहे. उपवनसंरक्षक पियुष जगताप आणि उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक विपीन लांडगे व आरएफओ ए. व्ही. लांबट या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

