बिरसी विमानतळ गोंदियाकरासाठी अल्लादिन का चिराग
प्रवासी विमानसेवेचीप्रतिक्षा : ६ महिन्यांपासून उड्डाणे ठप्प!
गोंदिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे उभारण्यात आलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज विमानतळ असूनही मागील सहा महिन्यांपासून प्रवासी विमानसेवा पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेली सेवा विमान कंपन्यांनी अचानक गुंडाळल्यामुळे (पॅकअप केल्यामुळे) गोंदियासह लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बिरसीवरून नियमित प्रवासी उड्डाणे पूर्ववत करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आतापर्यंत चार प्रमुख विमान कंपन्यांना प्रस्ताव धाडले आहेत; मात्र अद्याप एकाही कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
वर्षभरापूर्वी ‘स्टार एअर’ आणि ‘इंडिगो’ या दोन नामांकित विमान कंपन्यांनी बिरसी विमानतळावरून गोंदिया-हैदराबाद आणि गोंदिया-इंदूर या दोन महत्त्वाच्या मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरू केली होती. हावडा-मुंबई मुख्य रेल्वे मार्गावरील प्रमुख जंक्शन आणि मध्य प्रदेश-छत्तीसगडच्या सीमावर्ती भागाला जोडणारे केंद्र असल्याने या विमानसेवेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत होता. दररोज सव्वाशेहून अधिक प्रवासी या विमानसेवेचा नियमित लाभ घेत होते. बिरसी विमानतळावर अत्याधुनिक धावपट्टीसह नाईट लँडिंगची (रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याची) अद्ययावत सुविधा उपलब्ध असल्याने विमान कंपन्यांना उड्डाणासाठी अनुकूल वातावरण होते. तरीही वर्षभर नियमित सेवा दिल्यानंतर दोन्ही कंपन्यांनी देखभाल-दुरुस्तीचे कारण पुढे करत आधी तीन महिन्यांसाठी सेवा स्थगित केली आणि त्यानंतर गाशा गुंडाळला. परिणामी, गेल्या सहा महिन्यांपासून विमानतळावर शुकशुकाट पसरला असून प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे.
सेवा सुरू करण्यास कंपन्या का अनुत्सुक?
बिरसी विमानतळ सर्व सोयीसुविधांनी युक्त असूनही आणि प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत असतानाही खाजगी विमान कंपन्या येथून सेवा सुरू करण्यास उत्सुक का नाहीत, असा मोठा प्रश्नचिन्ह विमानतळ प्राधिकरणासमोर निर्माण झाला आहे. प्राधिकरणाने पाठविलेल्या प्रस्तावांवर अद्याप कोणत्याही कंपनीने अंतिम निर्णय घेतलेला नाही.
खासदार प्रफुल्ल पटेल विमान कंपन्यांशी चर्चा करणार
बिरसी विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी विमानसेवा पुन्हा सुरू व्हावी, यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवार, ८ नोव्हेंबर रोजी खासदार प्रफुल्ल पटेल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी परिस्थिती जाणून घेतल्यानंतर खासदार पटेल यांनी स्वतः पुढाकार घेण्याची ग्वाही दिली.
“बिरसी विमानतळावरून प्रवासी उड्डाणे तातडीने सुरू होण्यासाठी मी स्वतः दोन ते तीन प्रमुख खाजगी विमान कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी थेट चर्चा करणार असून, सेवा पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे,” असा दिलासा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विमानतळ अधिकाऱ्यांना दिला आहे.

