LatestNewsगोंदियाविदर्भ

मोबाईल दुकान फोडणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

३ विधीसंघर्ष बालकांना घेतले ताब्यात; ५.२५ लाखांचे ३७ अँड्रॉइड मोबाईल जप्त
गोंदिया :
गोरेगाव येथील मोबाईल दुकानाचे शटर तोडून लाखोंचे मोबाईल लंपास करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) गोंदियाच्या पथकाने अवघ्या दोन दिवसांत पर्दाफाश केला आहे. या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी तीन विधीसंघर्ष बालकांना शिताफीने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले तब्बल ५ लाख २५ हजार रुपये किमतीचे ३७ अँड्रॉइड मोबाईल हँडसेट जप्त केले आहेत. १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे.
मोहगाव बुज. (ता. जि. गोंदिया) येथील रहिवासी फिर्यादी सोमेंद्र छगनलाल पटले (वय ३३) यांचे गोरेगाव येथे मोबाईलचे दुकान आहे. ६ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजता ते दुकान बंद करून गेले असता, ७ नोव्हेंबरच्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून दुकानातील ३७ मोबाईल फोन चोरून नेले होते. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम ३०५(अ) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
सायबर व तांत्रिक माहितीच्या आधारे भंडारा जिल्ह्यातून आवळल्या मुसक्या:
घरफोडीच्या वाढत्या घटनांचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात विशेष पथके रवाना करण्यात आली. गोरेगाव व डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास सुरू असतानाच तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे म्हसवानी (ता. सडक अर्जुनी) येथील एका विधीसंघर्ष बालकाने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने ही चोरी केल्याचे उघड झाले.
हे तिघेही सध्या किन्ही/मोखे (ता. साकोली, जि. भंडारा) येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने तेथे छापा मारून तिघांनाही ताब्यात घेतले. खाक्या दाखवून चौकशी केली असता, त्यांनी गोरेगाव येथील दुकान फोडल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेले मोबाईल शाळेच्या बॅगेत लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी किन्ही/मोखे येथील एका विधीसंघर्ष बालकाच्या घरातून स्कूल बॅगमध्ये भरलेले विविध कंपन्यांचे ३७ महागडे अँड्रॉइड फोन (एकूण किंमत ५.२५ लाख रुपये) पंचांसमक्ष जप्त केले. या गुन्ह्याचा पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.
सदर धडक कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक जंगमवार, पोलीस हवालदार दीक्षितकुमार दमाहे, सुबोधकुमार बिसेन, इंद्रजित बिसेन, तुळशीदास लुटे, भोजराज बहेकार, पोलीस अंमलदार छगन विठ्ठले, हंसराज भांडारकर, निखिल मेश्राम, चालक पोलीस अंमलदार राम खंदारे तसेच सायबर सेलचे आकीब काझी व श्रेयस लांबट यांनी केली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *