LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; आमदार राजकुमार बडोले यांचे निर्देश

सडक अर्जुनी तालुक्यातील ७० पैकी तब्बल ६३ पाणीपुरवठा योजना बंद; प्रशासकीय अनास्थेवर व्यक्त केला तीव्र संताप!
सडक अर्जुनी :
आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात संभाव्य पाणीटंचाईची दाहकता वाढू नये यासाठी प्रशासनाने केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करून उपाययोजनांची युद्धपातळीवर अंमलबजावणी करावी. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी एक-एक हंड्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी संबंधित विभागाच्या सर्व यंत्रणांनी अधिक सजग राहावे, असे सक्त व स्पष्ट निर्देश अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी दिले.
पंचायत समिती सडक अर्जुनीच्या सभागृहात पाणीटंचाई निवारणासंदर्भात आयोजित महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते. तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग सडक अर्जुनी अंतर्गत तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या आढाव्यादरम्यान तालुक्यातील एकूण ७० पाणीपुरवठा योजनांपैकी केवळ ७ योजनाच प्रत्यक्षात सुरू असून तब्बल ६३ योजना बंद अवस्थेत असल्याचे अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले.
बंद योजना तातडीने पूर्ववत करण्याचे आदेश
पाणीपुरवठा योजनांचा हा बोजवारा पाहून आमदार बडोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ऐन टंचाईच्या तोंडावर ९० टक्के योजना बंद राहणे ही प्रशासकीय बेपर्वाई असल्याचे सांगत, बंद पडलेल्या सर्व योजनांची तांत्रिक व वीज दुरुस्ती तात्काळ करून त्या विनाविलंब पूर्ववत सुरू करण्याचे आदेश त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले.
टंचाई उद्भवण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक पावले उचला
आमदार राजकुमार बडोले म्हणाले की, तालुक्यातील अनेक दुर्गम गावे, पाडे व वस्त्यांमध्ये उन्हाळ्यात भूजल पातळी घटल्याने भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना शोधण्यापेक्षा आधीच संभाव्य पाणीटंचाईचा अचूक अंदाज घेऊन प्रतिबंधात्मक कृती आराखडा राबवणे गरजेचे आहे. बैठकीत टंचाई निवारणाच्या टप्पा क्रमांक १, २ आणि ३ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपायांवर सखोल चर्चा करण्यात आली.
ग्रामसेवक, तलाठी आणि पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी परस्पर समन्वय ठेवून प्रत्यक्ष गावनिहाय पाहणी करावी. कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्यासाठी जनतेचा आक्रोश होता कामा नये, याची थेट जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहील, असा इशाराही त्यांनी दिला. या उच्चस्तरीय आढावा बैठकीस पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, उपसभापती निशाताई काशीवार, जिल्हा परिषद सदस्य कविताताई रंगारी, निशाताई तोडासे, गटविकास अधिकारी आदित्य ठाकरे, सहाय्यक गटविकास अधिकारी टी. एम. खोटेले, पंचायत समिती सदस्य डॉ. रुकीराम वाढई, शिवाजी गहाणे, अल्लाउद्दीन राजानी, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय अभियंता टी. एम. मानकर यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख, ग्रामसेवक व तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *