गोंदियात दूध भेसळखोरांवर धडक कारवाई; दासगाव येथील ‘शिवसागर डेअरी’ सील, शेकडो किलो संशयास्पद माल नष्ट!
अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांच्या पथकाचा पहाटे ७ वाजता धाडसी छापा; अस्वच्छतेसह आढळले अज्ञात केमिकल
गोंदिया : राज्यात दुधात होणाऱ्या वाढत्या भेसळीला आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्हा दूध भेसळ प्रतिबंधक समितीने आज अत्यंत आक्रमक पवित्रा घेत मोठी कारवाई केली आहे. मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या आणि दुधात भेसळ करणाऱ्यांना सज्जड इशारा देत, सकाळी ७ वाजता अपर जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष अभिजित घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दासगाव येथील ‘शिवसागर डेअरी’वर अचानक छापा टाकला. या कारवाईत शेकडो किलो संशयास्पद आणि अस्वच्छ दुग्धजन्य पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले असून, सदर आस्थापना तत्काळ प्रभावाने बंद (सील) करण्यात आली आहे.दूध भेसळ रोखण्यासाठी १० सप्टेंबर २०२६ रोजी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ठरलेल्या रणनीतीनुसार मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करणारी दूध भेसळ मुळासकट उखडून टाकण्यासाठी ही गुप्त मोहीम राबवण्यात आली.छाप्यात उघडकीस आलेल्या धक्कादायक बाबी!अन्न व औषध प्रशासन (FDA), दुग्धव्यवसाय विकास विभाग, वैद्यमापन आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

डेअरीमध्ये प्रचंड अस्वच्छता आढळली असून, ‘एफएसएसएआय’ (FSSAI) अन्न परवाना मुदतबाह्य झाला असतानाही विनापरवाना व्यवसाय सुरू होता. माल खरेदी-विक्रीची कोणतीही नोंद तेथे नव्हती.जप्त व नष्ट करण्यात आलेला मालडेअरीतून १८ किलो पनीर, ९० किलो दही, २० किलो दूध, १७ किलो क्रीम, १५ किलो ताक, २ किलो खवा आणि अज्ञात केमिकल जप्त करण्यात आले. कोणत्याही मालावर लेबल किंवा उत्पादनाची तारीख नव्हती. नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून उरलेला सर्व माल तात्काळ नष्ट करण्यात आला. तसेच वजन काटा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समक्ष पारदर्शक कारवाईकारवाई पारदर्शक व्हावी यासाठी स्थानिक सरपंच, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व कोतवाल यांना घटनास्थळी बोलावण्यात आले होते. या सर्वांच्या समक्ष संशयास्पद माल नष्ट करण्यात आला. या प्रसंगी दुग्धशाळा व्यवस्थापक प्रशांत बोरसे, एफडीए सहाय्यक आयुक्त अमृता शिर्के, अन्नसुरक्षा अधिकारी ओंकार लांजेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय चव्हाण आणि वैद्यमापन निरीक्षक संजय कांबळे उपस्थित होते.गंभीर इशारा आणि नागरिकांना आवाहन”जिल्ह्यात दुग्धजन्य पदार्थांत भेसळ करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. अशी अचानक तपासणी मोहीम यापुढेही सुरूच राहील,” असा कडक इशारा अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी दिला आहे. तसेच दुधात वा दुग्धजन्य पदार्थांत भेसळ होत असल्याचा संशय आल्यास नागरिकांनी तात्काळ समितीकडे तक्रार करावी, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

