छोटा गोंदियात अवघ्या तीन तासांवर आलेला बालविवाह रोखण्यात यश
महिला व बालविकास विभाग, दामिनी पथकाची धडक कारवाई!
गोंदिया : दिवाळीच्या सणासुदीचा आणि धामधुमीचा फायदा घेत गुपचूप उरकण्यात येणाऱ्या एका बालविवाहाचा डाव जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी वेळीच हाणून पाडला आहे. गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटा गोंदिया येथील प्रगती कॉलनीत सुरू असलेला हा विवाह अवघ्या तीन तासांवर येऊन ठेपला असतानाच संयुक्त पथकाने धडक देऊन तो यशस्वीरीत्या रोखला. या कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीचे बालपण आणि भविष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असून, प्रशासनाच्या या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लग्नाची सर्व तयारी पूर्ण; दुपारी २:३० वाजता पथकाची धडक:
मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी छोटा गोंदियातील प्रगती कॉलनी परिसरात एक बालविवाह पार पडणार असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पोलिसांचे दामिनी पथक, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी आणि चाइल्ड हेल्पलाइनचे एक संयुक्त पथक तातडीने तयार करण्यात आले. या पथकाने अंगणवाडीमार्फत वधू-वराचे अधिकृत जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले असता, संबंधित मुलीचे वय १७ वर्षे ७ महिने आणि २० दिवस इतके असल्याचे निष्पन्न झाले. कायद्याने विवाहासाठी मुलीचे किमान वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असल्याने हा विवाह बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले.
लग्नसोहळा सायंकाळी ५:३० वाजता पार पडणार होता आणि मंडपात लग्नाची सर्व तयारीही पूर्ण झाली होती. मात्र, विधी सुरू होण्यापूर्वीच दुपारी २:३० वाजता संयुक्त पथकाने विवाहस्थळी धडक दिली.
कायदेशीर समज आणि पालकांकडून हमीपत्र:
पथकातील अधिकाऱ्यांनी वर, वधू, दोन्ही बाजूंचे आई-वडील आणि उपस्थित नातेवाइकांना ताब्यात घेऊन कायद्याची जाणीव करून दिली. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणे हा गंभीर गुन्हा असून यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच कमी वयात विवाह केल्याने मुलीच्या आरोग्यावर आणि भविष्यावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. अखेर दोन्ही कुटुंबीयांनी चूक मान्य करत मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचा विवाह करणार नाही, असे लेखी कायदेशीर हमीपत्र प्रशासनाला लिहून दिले. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी संबंधित बालिकेला गोंदिया येथील बालकल्याण समितीसमोर (CWC) हजर करण्यात आले.
बालविवाहाची माहिती मिळताच १०९८ वर संपर्क साधा:
सण-उत्सव हे आनंद साजरा करण्याचे पर्व असते, मात्र अशा अनिष्ट प्रथांमुळे एखाद्या अल्पवयीन जीवाचे आयुष्य संकटात सापडू नये यासाठी नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे. ‘बालविवाह मुक्त गोंदिया’ अभियानांतर्गत परिसरात कोठेही बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ अंगणवाडी सेविका, नजीकचे पोलीस ठाणे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा चाइल्ड हेल्पलाइनच्या १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सदर कारवाई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे आणि इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत सोसायटीचे संचालक अमित बेलेकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे धर्मेंद्र भेलावे, दामिनी पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक मनीषा निकम, सहायक फौजदार राधेश्याम फुंडे, महिला पोलीस अंमलदार वैशाली भांदक्कर, सुरेखा मेंढे, चाइल्ड लाइनचे आनंद रामटेके, पूजा अनकर आणि हर्ष चव्हाण यांनी सक्रिय सहभाग घेतला.

