LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

मोहर्ली वनपरिक्षेत्रात दबा धरून बसलेल्या वाघाचा भीषण हल्ला; गुरे चारण्यासाठी गेलेला २४ वर्षीय गुराखी जागीच ठार!

कक्ष क्र. १५४ मधील घटना; परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले
चंद्रपूर: मोहर्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोहर्ली १ बीटमधील जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका २४ वर्षीय गुराख्यावर वाघाने अचानक प्राणघातक हल्ला चढवून त्याला जागीच ठार केल्याची थरारक घटना घडली. या घटनेमुळे जुनोना व लगतच्या परिसरातील गावांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे.
विजय मधुकर मेश्राम (वय २४ वर्षे, रा. जुनोना) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
गुरे चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास विजय मेश्राम हे नेहमीप्रमाणे मोहर्ली १ बीटमधील कक्ष क्रमांक १५४ च्या जंगल परिसरात गुरे चरावावयास गेले होते. दरम्यान, जंगलात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने विजय यांच्यावर अचानक मागून जोरदार झडप घातली. हा हल्ला इतका भीषण होता की, विजय यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मोहर्ली (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेगावकर व त्यांचे पथक, मानद वन्यजीव रक्षक मुकेश भांदककर तसेच स्थानिक क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
५० हजारांची तातडीची आर्थिक मदत सुपूर्द
वनविभाग व पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून संयुक्त पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या दुर्दैवी घटनेनंतर वनविभागाच्या वतीने मृताची आई निरंजना मधुकर मेश्राम यांना ५०,००० रुपयांची तातडीची सानुग्रह आर्थिक मदत धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आली.
परिसरात कॅमेरा ट्रॅप; जंगलात न जाण्याचे आवाहन
हल्ल्यानंतर संबंधित वाघाचा माग काढण्यासाठी आणि त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाकडून परिसरात कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले आहेत. तसेच जुनोना व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी जंगलात जाणे पूर्णपणे टाळावे आणि दैनंदिन कामे करताना विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागातर्फे ध्वनिक्षेपकाद्वारे व जनजागृती मोहिमेतून करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील सखोल तपास वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *