भीषण अपघातात ट्रकने दुचाकी चालकास चिरडले
महामार्ग क्र.५३ वरील अग्रेसर चौकातील घटना
भाऊबीजच्या आनंदावर विरजन
देवरी : देवरी शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील अग्रेसर चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक् दिली. या हृदयद्रावक घटनेत दुचाकीस्वार युवकाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. ही घटना आज (ता.११) दुपारी ४ ते ४.३० वाजता सुमारासची आहे. शिवलाल फाफनवाडे (४८) रा.डवकीटोला असे मृतकाचे नाव आहे. भाऊबीज सणाच्या दिवशी घडलेल्या या भीषण घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
सविस्तर असे की, डवकीटोला येथील शिवलाल फाफनवाडे हे देवरी येथून आपल्या गावाकडे दुचाकी क्र.एमएच-३५/ एम-५८६२ ने महामार्गावरून जात होते. तर दुसरीकडे नागपूरकडून रायपूरच्या दिशेने जाणार्या भरधाव ट्रक क्र.एमएच-१४ जेएल २२७७ ने अग्रेसन चौक परिसरात ट्रकने दुचाकीला चिरडत नेले. भीषण अपघातात ट्रकच्या चाकाखाली आल्याने शिवलाल फाफनवाडे याचा जागीच मृत्यू झाला. धडकेनंतर ट्रकने दुचाकीला अंदाजे ८० फूट अंतरापर्यंत फरफटत नेल्याचे सांगण्यात येत आहे. भाऊबीजेच्या दिवशी एका कष्टाळू कुटुंबाचा आधार हिरावून घेणार्या या दुर्घटनेने नागरिकांचे मन हेलावले आहे. देवरी शहरातील महामार्गावरील वाढत्या अपघातांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. या दुर्घटनेनंतर देवरी शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. देवरी शहरासाठी उड्डाणपुलाचा प्रस्ताव चर्चात असताना कॉलमयुक्त उड्डाणपुलाच्या मागणीवरून उपविभागीय कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर उड्डाणपुलाचा प्रस्ताव रद्द झाला असावा, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

