नाटक बघायला गेलेल्या कुटुंबाच्या घरी डल्ला
साडेअदोन लाखांचा ऐवज व रोख रक्कम लंपास
सडक अर्जुनी : तालुक्यातील कोसमतोंडी येथे कुटुंबीयांसह गावातील नाटकाचा कार्यक्रम बघण्यासाठी गेलेल्या एका कुटूूंबियाच्या बंद घराचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ऐवज व रोख रक्कमेवर हात साफ केला. घरातील किचनच्या खिडकीतून आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले तब्बल १ लाख ४३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १ लाख ३० हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबवला. ही घटना ११ नोव्हेंबरच्या रात्री १०:४५ वाजता दरम्यानची आहे. या प्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, फिर्यादी विजय सदाशिव पुस्तोडे (४५) रा.कोसमतोंडा हे ११ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आपल्या पत्नी व पाहुण्यांसह गावातीलच एका नाटक कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. दरम्यान, रात्री १०:४५ ते १२ नोव्हेंबर रोजी पहाटे ४:४५ वाजेच्या दरम्यानच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डाव साधून घरफोडी केली. चोरट्यांनी घराच्या किचनच्या खिडकीतून आत प्रवेश करून बेडरूममधील दोन कपाटाचे लॉक तोडले आणि एका कपाटातील १ लाख ३० हजार रुपये नगदी तसेच दुसर्या कपाटातील सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तात्काळ डुग्गीपार पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोनि कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली परिपोउपनि ऋषिकेश शेजाळ करीत आहेत. सणासुदीच्या किंवा कार्यक्रमांच्या काळात घर बंद करून बाहेर जाताना नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

