LatestNewsगोंदियाविदर्भ

हरविलेले २९ मोबाईल शोधून देवरी पोलिसांनी केले मूळ मालकांच्या स्वाधीन!

CEIR पोर्टल व सायबर सेलच्या मदतीने पोलिसांची धडक मोहीम
देवरी (गोंदिया) :
देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विविध कारणांमुळे गहाळ अथवा हरविलेले तब्बल २९ महागडे अँड्रॉइड मोबाईल फोन शोधून काढण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. केंद्र शासनाचे ‘सीईआयआर’ (CEIR) पोर्टल आणि गोंदिया सायबर सेलच्या आधुनिक तांत्रिक मदतीचा प्रभावी वापर करून शोधण्यात आलेले हे सर्व मोबाईल फोन बुधवारी, ७ ऑक्टोबर रोजी एका विशेष कार्यक्रमात मूळ मालकांच्या हाती सुपूर्द करण्यात आले. हरवलेले फोन पुन्हा हातात मिळताच नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
सविस्तर वृत्त असे की, देवरी शहर व परिसरातील नागरिकांचे मोबाईल फोन गहाळ झाल्याबाबत देवरी पोलीस ठाण्यात वेळोवेळी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सर्वसामान्य नागरिकांचा वैयक्तिक डेटा, संपर्क क्रमांक आणि कष्टाच्या पैशातून घेतलेला मोबाईल हरवल्याने नागरिक हवालदिल झाले होते. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली देवरी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली.
पोलिसांनी भारत सरकारच्या ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ (CEIR) पोर्टलवर हरविलेल्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक ट्रॅकिंगवर टाकले. सायबर सेलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी कसून तपास करत विविध भागांतून शोध घेतलेले एकूण २९ अँड्रॉइड मोबाईल यशस्वीरीत्या हस्तगत केले.
एसडीपीओंच्या उपस्थितीत मोबाईल वितरण
शोधण्यात आलेले हे सर्व मोबाईल मूळ मालकांना परत करण्यासाठी ७ ऑक्टोबर रोजी देवरी पोलीस ठाण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमगाव उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी (तथा अतिरिक्त कार्यभार देवरी) नंदिनी चानपुरकर यांच्या हस्ते नागरिकांना त्यांचे हरविलेले मोबाईल फोन सन्मानाने परत करण्यात आले. अचानक हरवलेला फोन पुन्हा सुस्थितीत मिळाल्याने नागरिकांनी देवरी पोलिसांच्या तत्परतेचे व कार्यक्षमतेचे आभार मानत भरभरून कौतुक केले. या उपक्रमामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये पोलिसांप्रती विश्वास अधिक दृढ झाला आहे.
ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे (कॅम्प देवरी) व उपविभागीय पोलीस अधिकारी नंदिनी चानपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवरीचे पोलीस निरीक्षक गणेश कृष्णा वनारे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक हर्षा भोग, महिला पोलीस नाईक लता राजोभोज, पोलीस शिपाई मो. अन्सार इक्बाल कुरेशी आणि महिला पोलीस शिपाई सुरेखा सोनवाने यांनी केली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *