LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

आदिवासी दिनानिमित्त ‘जय सेवा’चा गजरात गोंदियात धडकले पिवळे वादळ

आदिवासी समाज संघटनेतर्फे भव्य महारॅली; पारंपरिक पेहराव अन् लोकनृत्यांतून घडले संस्कृतीचे दर्शन
गोंदिया :
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रविवारी (९ ऑगस्ट) गोंदिया शहरात आदिवासी समाज संघटनेच्या वतीने भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हजारोच्या संख्येने सहभागी झालेल्या समाजबांधवांनी परिधान केलेले पारंपरिक पिवळे पोशाख आणि हातांतील पिवळ्या झेंड्यांमुळे अवघे गोंदिया शहर पिवळ्या रंगात रंगून गेले होते. ‘जय सेवा… जय बिरसा मुंडा’ आणि ‘संविधानाची रक्षा आम्ही करू’ अशा कडकडणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
जिल्ह्यात ठिकठिकाणी आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोंदिया शहरात महारॅलीपूर्वी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये समाजसंघटनेच्या पुढाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

महारॅलीतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन
सभा संपल्यानंतर भव्य महारॅली शहर भ्रमण करण्यासाठी निघाली. या महारॅलीमध्ये सहभागी कलावंतांनी व समाजबांधवांनी आपल्या पारंपरिक वाद्यवृंद व नृत्यांच्या साहाय्याने आदिवासी संस्कृतीची अप्रतिम झलक दाखवली. रॅलीने नवीन प्रशासकीय इमारत, आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक, नेहरू चौक, गोरेलाल चौक, दुर्गा चौक, चांदणी चौक, गांधी चौक, जयस्तंभ चौक, उड्डाणपूल, मरारटोली बसस्थानक मार्गे आंबेडकर भवन (मरारटोली) येथे रॅली भ्रमण केले.
ठिकठिकाणी अल्पोपाहाराचे वाटप
रॅलीदरम्यान समाजबांधवांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी विशेष सोय करण्यात आली होती. चांदणी चौक, नगर परिषद, गांधी पुतळा परिसरामध्ये आमदार, माजी आमदार, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांसाठी अल्पोपाहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
रॅलीच्या सांगतेनंतर आयोजित कार्यक्रमात हजारो आदिवासी बांधव एकत्र आले होते. ‘जय आदिवासी, जय बिरसा’च्या जयघोषाने संपूर्ण गोंदिया जिल्हा भक्तिमय व उत्साही वातावरणात न्हाऊन निघाला होता.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *