गोंदियात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम ! ११ लाखांचा अप्रमाणित व भेसळयुक्त अन्नसाठा जप्त
६५ आस्थापनांची तपासणी, ९ परवाने केले निलंबित!
गोंदिया : दिवाळी व सणासुदीच्या काळात नफेखोरीसाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित, सकस आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी गोंदिया जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या धडक मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील तब्बल ६५ अन्न व्यवसाय आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली असून, सुमारे १० लाख ९० हजार रुपये किमतीचा ४ हजार ६८५ किलोहून अधिक अप्रमाणित व असुरक्षित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. अन्नसुरक्षा नियमांचे उघड उल्लंघन करणाऱ्या ९ आस्थापनांचे परवाने थेट निलंबित करण्यात आल्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात ही व्यापक मोहीम हाती घेण्यात आली होती. सणासुदीच्या काळात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, तूप आणि इतर किराणा जिनसांमध्ये भेसळ होण्याची दाट शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने जिल्ह्यातील मिठाई दुकाने, कारखाने, खाद्यतेल विक्रेते आणि घाऊक गोदामांवर अचानक छापे टाकले.
३६ आस्थापनांना सुधारणा नोटीस; ७३ हजारांचा दंड वसूल
तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींवरून प्रशासनाने ३६ आस्थापनांना तातडीने सुधारणा करण्याचे आदेश देत अधिकृत नोटिसा बजावल्या आहेत. याशिवाय नियमांचा भंग करणाऱ्या ६ प्रकरणांमध्ये तडजोड कारवाई (कम्पाउंडिंग) करून संबंधितांकडून ७३ हजार रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला. गंभीर त्रुटी व अस्वच्छता आढळून आलेल्या ९ व्यावसायिकांचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.
५५ अन्न नमुने प्रयोगशाळेकडे रवाना
मोहिमेदरम्यान गुणवत्तेचा संशय आल्याने पथकाने विविध दुकानांतून खवा, मिठाई व इतर खाद्यपदार्थांचे ५५ नमुने रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. यातील काही नमुन्यांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित असून, ते प्राप्त झाल्यानंतर अहवालानुसार संबंधितांवर थेट न्यायालयात फौजदारी खटले दाखल करण्यासह कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
दिवाळीच्या काळात मिठाई किंवा इतर अन्नपदार्थ खरेदी करताना नागरिकांनीही सजग राहावे, अन्नपदार्थांचा दर्जा व साठवणूक तपासावी आणि भेसळीचा संशय आल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन अन्न सुरक्षा विभागामार्फत करण्यात आले आहे.

