वडसा-अर्जुनी रस्त्याची चाळण; संतप्त नागरिकांचा टी-पॉईंटवर ठिय्या, वाहतूक ठप्प
वडसा-अर्जुनी मार्गाच्या दुरुस्तीसाठी आमदार मसराम यांच्या नेतृत्वात तीव्र ‘रास्ता रोको’
देसाईगंज (गडचिरोली ) : वडसा (देसाईगंज) ते अर्जुनी (जि. गोंदिया) या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गाची गेल्या अनेक महिन्यांपासून कमालीची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी वारंवार शासनाकडे मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने, रविवारी संध्याकाळी आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात वडसा–अर्जुनी टी-पॉईंट येथे तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील शेतकरी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी, वाहनचालक, महिला तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाढलेल्या अपघातांच्या घटनांबाबत संतप्त नागरिकांनी यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार नारेबाजी करत तीव्र आक्रोश व्यक्त केला.
यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना आमदार रामदास मसराम म्हणाले की, वडसा–अर्जुनी मार्ग हा सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, मात्र या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाल्याने दररोज अपघात घडत असून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. मार्गाच्या दुरुस्तीसाठी आपण अनेकदा शासन व संबंधित विभागाकडे निधीची मागणी केली, मात्र सरकारमधील आमदारांना भरीव निधी दिला जातो आणि विरोधी पक्षांतील आमदारांना तोकडा निधी देऊन दुजाभाव केला जातो, असा थेट आरोप त्यांनी सरकारवर केला. नागरिकांच्या भावना आणि संताप शासनापर्यंत पोहोचवण्यासाठीच आपल्याला आंदोलनाचा हा मार्ग स्वीकारावा लागला असून, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू झाले नाही तर जनतेला सोबत घेऊन यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनाची तीव्रता आणि नागरिकांचा रोष पाहता सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी आमदार मसराम यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला आणि चालू वर्षाच्या बजेटमध्ये निधी मंजूर करून या रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करू, असे आश्वासन दिले. दरम्यान, या आंदोलनामुळे वडसा–अर्जुनी मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती आणि रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळासाठी स्थानबद्ध केले, त्यानंतर हे आंदोलन समाप्त होऊन वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
या आंदोलनात काँग्रेस कमिटीचे देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, माजी उपसभापती नितीन राऊत, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, माजी जिल्हा परिषद सदस्य जयमाला पेंदाम, माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, नगरसेवक तथा गटनेता विकास प्रधान, नगरसेविका आशा दहिवले, नगरसेविका फेमिदा पठाण, नगरसेविका मंदा समर्थ, हंसराज लांडगे, इलियास पठाण, कमलेश बारस्कर, डोमजी दिवटे, सागर वाढई, खेमराज प्रधान, कैलास राणे, आरती लहरी, प्रकाश सांगाडे, गजेंद्र नाईक, गणेश करपते, उपसरपंच गजानन सेलोटे, अरुण कुंभरवार, प्रकाश समर्थ, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर भर्रे, सचिन राऊत, राजेंद्र कोडपे, देवनाथ सयाम, प्रमोद मेश्राम, राजकुमार मेश्राम, नंदू चावला, प्रभाकर राऊत, शीला मेश्राम, अस्मिता रामटेके, पुष्पा बोदेले, हाजरा शेख, सुशीला गजभिये, मुक्ता चंडीकार, कैलास बगमारे यांच्यासह देसाईगंज आणि आरमोरी परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

