LatestNewsगोंदियाविदर्भ

‘स्वच्छ गोंदिया – सुंदर गोंदिया’ अभियानाचा धडाक्यात शुभारंभ! नगराध्यक्ष सचिन शेंडे स्वतः उतरले मैदानात; हातात झाडू घेऊन केले प्रत्यक्ष श्रमदान!

गोंदिया : गोंदिया शहराला स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी गोंदिया नगर परिषदेच्या वतीने ‘स्वच्छ गोंदिया – सुंदर गोंदिया’ या विशेष महास्वच्छता अभियानाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला आहे. केवळ कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागातून शहराचा कायापालट करण्याचा संकल्प या मोहिमेतून करण्यात आला आहे. या अभियानाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे स्वतः नगराध्यक्ष सचिन शेंडे हे दररोज एक तास शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष झाडू हाती घेऊन श्रमदान करणार आहेत.
शहर चकाचक आणि निरोगी ठेवणे ही केवळ नगर परिषदेच्या सफाई कामगारांचीच जबाबदारी नसून, प्रत्येक गोंदियाकराने आपल्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, या लोकसहभागाच्या उद्देशातून या मोहिमेची आखणी करण्यात आली आहे. अभियानाच्या पहिल्याच दिवशी सुभाष गार्डन परिसर, उड्डाणपूल (ओव्हरब्रिज) आणि इंदिरा गांधी स्टेडियम परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवून साचलेला कचरा, पालापाचोळा आणि प्लॅस्टिक कचरा हटवण्यात आला. नगराध्यक्ष स्वतः रस्त्यावर उतरून सफाई करत असल्याचे पाहून स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्येही एक नवा उत्साह दिसून आला.
येत्या काही दिवसांत या अभियानांतर्गत शहरातील सर्व मुख्य बाजारपेठा, सार्वजनिक उद्याने, प्रमुख चौक, गजबजलेले रस्ते तसेच सर्व प्रभागांतील गल्लीबोळांमध्ये टप्प्याटप्प्याने ही सखोल मोहीम राबवली जाणार आहे. कचरा कुंडीबाहेर न टाकणे, ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत देणे आणि एकल-वापर प्लॅस्टिकचा वापर टाळणे याबाबतही प्रभागांमध्ये नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाबाबत नगराध्यक्ष सचिन शेंडे यांच्यासह अमर वराडे आणि डॉ. अभिजीत देशपांडे यांनी सविस्तर माहिती दिली. गोंदियाला विदर्भातील एक आदर्श, हरित आणि स्वच्छ शहर बनवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यापारी वर्ग आणि सामान्य गोंदियाकरांनी या स्वच्छता महायज्ञात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *