LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

भंडार्‍यात ईव्हीएमची अंत्ययात्रा; सर्वपक्षीय मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला

आ. नरेंद्र भोंडेकर मोर्च्यात सहभागी; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

भंडारा : नुकत्याच पार पडलेल्या भंडारा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र.३ मध्ये ईव्हीएममध्ये एका उमेदवाराचे व नोटाचे नाव गायब असल्याचे आढळून आले. जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी या प्रकरणात सात कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. मात्र ईव्हीएम घोटाळ्यातील खर्‍या सूत्रधारांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईव्हीएमविरोधात २९ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात आ.नरेंद्र भोंडेकर सहभागी झाले होते. माजी आ. चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्च्याच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यातील भंडारासह तुमसर, पवनी व साकोली/सेंदूरवाफा नगरपालिकेची निवडणूक शांततेत पार पडली. दि.२१ डिसेंबर रोजी मतमोजणीदरम्यान भंडारा नगरपालिका प्रभाग क्र.३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नगरसेवक पदाचे उमेदवार करुणा राऊत व नोटाचे नावच गायब असल्याचे दिसून आले. यामुळे निवडणुकीवर संशय व्यक्त करण्यात आले. प्रकार उघडकीस येताच मतमोजणीदरम्यान मतमोजणी केंद्रावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. या प्रकरणात जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सावनकुमार यांनी प्रभाग क्र.३ मधील मतदानयंत्र तयार करताना निष्काळजीपणा करीत एका उमेदवारासह नोटाचे पर्याय झाकले गेले. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणात ७ अधिकारी/कर्मचारी यांना निलंबित केले. मात्र, याच प्रकरणातील निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच भंडारा नगरपालिका मुख्याधिकारी यांचेवर कार्यवाही करण्यात आली नाही. केवळ कर्मचार्‍यांवर कारवाई करून याप्रकरणातील खर्‍या सूत्रधारांना वाचविण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे. यावरून भंडारा नगरपालिकेची निवडणूक संशयास्पद असून फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी निवडणुकीत पराभूत उमेदवारांकडून करण्यात आली. असा प्रकार इतरही प्रभागात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने फेरनिवडणूक घेऊन दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी या मागणी संदर्भात ईव्हीएमविरोधात दि.२९ डिसेंबर २०२५ रोजी माजी आ. तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांचे नेतृत्वात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य मार्गाने शासनाविरोधात घोषणा देत काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला आ. नरेंद्र भोंडेकर, माजी आ. चरण वाघमारे, राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्दे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, माजी जि.प.सदस्य तथा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, डॉ. अश्विनी भोंडेकर, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री बोरकर व अन्य मान्यवरांनी सभेला संबोधित केले. जिल्हाधिकार्‍यांनी सभास्थळी जाऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी मोर्च्यात शेषराज रामटेके, मनोज बागडे, अशोक कापगते, सुनीता कापगते, हिवराज उके, शिवकुमार गणवीर, नरेंद्र वाडीभस्मे, डी.जी.रंगारी तसेच सर्वपक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. यावेळी १२ जानेवारी २०२६ पर्यंत दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करा अन्यथा त्यानंतर यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा प्रशासनाला देण्यात आला.

……………………..

ईव्हीएमच्या विरोधात जनतेत आक्रोश आहे. राज्यात व देशात ईव्हीएमविरोधात आंदोलन केले जात आहे. ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावा अशी बहुतांश पक्षाची मागणी आहे. ईव्हीएममध्ये घोळ असल्याचे भंडारा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र.३ मध्ये दिसून आले. यात पक्षाच्या एका उमेदवारासह नोटाचे नाव गायब दिसून आले. यावरून ईव्हीएममध्ये घोळ होत असल्याचे स्पष्ट होते. असे प्रकार लोकशाहीला घातक आहेत. जिल्हाधिकारी एका पक्षाच्या जबाबदार नेत्याच्या दबावात काम करीत आहेत. भंडारा नगरपालिका निवडणूक संशयाच्या घेर्‍यात असून इतरही प्रभागात ईव्हीएम घोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणातील खर्‍या सुत्रधारांना वाचविले जात आहे. त्यांचेवर तत्काळ कारवाई करण्यात यावी तसेच भंडारा नगरपालिकेची फेरनिवडणूक घेण्यात यावी अन्यथा १२ जानेवारीनंतर यापेक्षाही मोठे आंदोलन केले जाईल.

चरण वाघमारे, माजी आमदार

…………………………….

भंडारा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र.३ मध्ये मतदान यंत्रात उमेदवाराचे नाव गायब दिसून आले. ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणात सात कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. मात्र मोठ्या अधिकार्‍यांना वाचविण्याचा प्रयत्न जिल्हाधिकार्‍यांकडून एका पक्षाच्या नेत्याच्या दबावाखाली केला जात आहे. या सर्व प्रकाराला झोनल अधिकारी जबाबदार असताना त्यांचेवर कार्यवाही केली जात नाही. प्रकार उघडकीस येताच आम्ही निवडणुकीवर संशय व्यक्त केला होता. राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाचे गांभिर्य ओळखून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी आमची मागणाr आहे. हा सर्व प्रकार माझ्या क्षेत्रात येत असल्याने आपण आजच्या सर्वपक्षीय मोर्च्यात सहभागी झाले.

नरेंद्र भोंडेकर, आमदार भंडारा

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *