संविधानिक संस्थांनी निष्पक्षता पाळलीच पाहिजे; वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सूर
नमाद महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
गोंदिया : शासक असोत कि प्रशासक त्यांच्या अधिकारांचा स्रोत हा मतदार व देशातील सामान्य नागरिक असतो. त्यामुळे शासन कारभार चालविताना सामान्य जनता डोळ्यासमोर असली पाहिजे, त्यांच्याप्रती ते उत्तरदायी असले पाहिजेत. संविधानिक संस्थांना संविधानाद्वारे अधिकाराची प्राप्ती होते. या संस्थांच्या निष्पक्षतेवरच नागरिकांचे हित आणि संविधानाची यशस्विता अवलंबून असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून संवैधानिक संस्थांनी निष्पक्षता पाळलीच पाहिजे, असा सूर ‘भारतीय लोकशाही: निष्पक्ष निवडणूक आयोग व संविधानिक मूल्य या विषयावर’ या विषयावर आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थांनी काढला.
गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय गोंदिया आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर ऑर्गनायझेशन,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र मोहतुरे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेतील सहभागींनी देशभरात आणि विदेशात सुरु असलेल्या विविध आंदोलनाचा संदर्भ सांगत भारतीय लोकशाहीच्या जमेच्या बाजू आणि राज्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर प्रकाश टाकला. संविधान चांगले असून त्याची अंमलबजावणी करणारे नालायक असतील तर काहीही फायदा होत नाही उलट संविधान कसेही असले तरी अंमलबजावणी करणारे चांगले असतील तर ते संविधान उत्कृष्ट ठरते, हे उदाहरण देऊन भारताच्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर दृष्टिक्षेप टाकला. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या एका टिप्पणीमुळे देशात काकरोच जनता पार्टीची स्थापना झाल्याचे उदाहरण मांडले. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या संस्था यांनी निष्पक्षता पाळलीच पाहिजे, असे आवाहन विध्यार्थ्यानी केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र मोहतुरे यांनी भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्ये, निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकांचे महत्त्व, निवडणूक आयोगाची भूमिका तसेच भारतीय संविधानाने दिलेली न्याय, स्वातंत्र्य,समता, बंधुता हे मूल्य यावर सविस्तर प्रकाश टाकला. स्पर्धेचे परीक्षण डॉ. दिशा गेडाम ,डॉ. अश्विन खांडेकर, डॉ. यांत्रिक भगत व डॉ. प्रमोद सरदार यांनी केले. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक सौरभ कोल्हटकर एम. बी. पटेल फार्मसी कॉलेज, गोंदिया यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक मानसी चूटे भवभूती महाविद्यालय, आमगाव, तिसरा क्रमांक शालिनी मरसकोल्हे, एम. बी. पटेल कॉलेज, सालेकसा तर प्रोत्साहन पुरस्कार साहिल नागवंशी व सोनम सिंगनधुपे नमाद महाविद्यालय, गोंदिया यांनी पटकावला.
वक्तृत्व स्पर्धेला डॉ. किशोर वासनिक, डॉ. शशिकांत चौरे, डॉ. बबन मेश्राम डॉ. भावेश जसानी, डॉ. उमेश उदापुरे, डॉ. शशिकांत कडू, डॉ. अंबादास बाकरे, डॉ.घनशाम गेडेकर, डॉ. विनोद गेडाम, प्रा. रितेश चौरावार, डॉ. संतोष होतचंदानी, प्रा. शैलेंद्र गुप्ता, डॉ.तारेन्द्र पटले आदी उपस्थित होते. स्पर्धेचे संचालन, प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.अलका पाटील यांनी तर आभार अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रियदर्शना नंदेश्वर यांनी मानले. स्पर्धेला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

