अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या १३ बैलबंड्या तहसील कार्यालयात जमा !
रेती तस्करांवर महसूलचा थेट हातोडा! सडक अर्जुनी, कोहमारा व केसलवाड्यात धाड
सडक अर्जुनी (गोंदिया): सडक अर्जुनी तालुक्यात नदीपात्रातून गौण खनिजाची चोरी करून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांविरोधात महसूल प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने सडक अर्जुनी, कोहमारा आणि केसलवाडा परिसरात एकाच वेळी धडक मोहीम राबवून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तब्बल १३ बैलबंड्या रंगेहात पकडून जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या सर्व १३ बैलबंड्या तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आल्या असून, या कारवाईने तालुक्यातील अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यातील विविध नद्या व नाल्यांच्या पात्रातून कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून बैलबंड्यांच्या माध्यमातून त्याची छुप्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे २८ ऑक्टोबर रोजी महसूल पथकाने तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी अचानक नाकाबंदी व गस्त सुरू केली.
या मोहिमेदरम्यान सडक अर्जुनी येथील शिवमंदिर परिसरातून रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या ५ बैलबंड्या ताब्यात घेण्यात आल्या. त्यानंतर कोहमारा परिसरात धाड टाकून ३ बैलबंड्या, तर केसलवाडा शिवारातून आणखी ५ बैलबंड्या महसूल पथकाने जप्त केल्या. पथकाने कोणतीही सवलत न देता सर्व १३ बैलबंड्या ताब्यात घेऊन थेट सडक अर्जुनी तहसील कार्यालयात आणून लावल्या आहेत.
ही धडक मोहीम तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या निर्देशानुसार तलाठी मयूर थोरवे, आंबेकर, विकी पवनकर आणि सूरज नागरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. महसूल विभागाच्या या अचानक झालेल्या छाप्यामुळे परिसरात सुरू असलेल्या वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ग्रामीण भागात बैलबंड्यांच्या आडून दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वाळू चोरीचे रॅकेट सक्रिय झाले आहे. महसूल प्रशासनाने आता या लहान वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला असला, तरी या वाळू चोरीच्या मागे असलेल्या मुख्य वाळू माफियांवर आणि मोठ्या वाहनांवर प्रशासन कधी आणि कशी कठोर कारवाई करणार, याकडे आता संपूर्ण सडक अर्जुनी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
“गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर आम्ही थेट कारवाई केली आहे. यापुढेही तालुक्यात कुठेही बैलबंडी किंवा इतर वाहनांद्वारे अवैध गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास थेट जप्तीची कठोर कारवाई करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.”
— इंद्रायणी गोमासे, तहसीलदार, सडक अर्जुनी

