गोंदिया जिल्हा प्रशासनाचा ४.७८ लाख पशुधनासाठी ‘चारा-पाणी आराखडा’ सज्ज
दुष्काळात मुक्या जनावरांचे हाल होऊ देणार नाही! दररोज लागणार १.११ कोटी लिटर पाणी!
गोंदिया : जिल्ह्यावर ओढवलेल्या संभाव्य दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाईच्या सावटात बळीराजाच्या जिवाभावाच्या पशुधनाला वाचवण्यासाठी गोंदिया जिल्हा प्रशासनाने ऑक्टोबर महिन्यातच कंबर कसली आहे. जिल्ह्यातील तब्बल पावणेपाच लाख मुक्या जनावरांना दुष्काळाच्या झळा बसू नयेत म्हणून जिल्हा प्रशासनाने ‘चारा व पाणी टंचाई कृती आराखडा २०२६-२७’ तयार केला आहे. २१ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यातील ४ लाख ७८ हजार १४८ पशुधनाला जगवण्यासाठी दररोज १ कोटी ११ लाख लिटर पाणी आणि सुमारे १९८० मेट्रिक टन चाऱ्याची गरज भासणार असून, ऐन उन्हाळ्यात जनावरांवर चारा छावण्यांची वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन आखले आहे.
२१ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात २ लाख ४७ हजार ३१० गायवर्ग व म्हैसवर्ग, ३३ हजार ७२४ लहान वासरे व १ लाख ९७ हजार ११४ शेळ्या-मेंढ्या आहेत. शासकीय निकषानुसार मोठ्या जनावराला दररोज ४० लिटर, लहान जनावराला १५ लिटर आणि शेळी-मेंढीला ४ लिटर पाण्याची आवश्यकता असते. यानुसार जिल्ह्याला प्रतिदिन १ कोटी ११ लाख ८६ हजार ७१६ लिटर पाण्याचा पुरवठा करावा लागणार आहे. तालुकानिहाय आकडेवारीत सर्वाधिक पाण्याची गरज गोंदिया तालुक्याला (२७.३६ लाख लिटर), त्यानंतर तिरोडा (२२.४७ लाख लिटर) आणि गोरेगावला (१२.३७ लाख लिटर) भासणार आहे; तर अर्जुनी मोरगाव तालुक्याला सर्वात कमी (५.८१ लाख लिटर) पाण्याची गरज असेल.
पशुधनाची तालुकानिहाय आकडेवारी:
जिल्ह्यात तिरोडा तालुक्यात सर्वाधिक १,०२,४८५ पशुधन असून गोंदिया तालुक्यात १,१२,३३०, गोरेगाव ५०,१०४, आमगाव ४९,२०४, सालेकसा ३८,३५७, देवरी ५३,७१५, सडक अर्जुनी ४३,५३२ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात २८,४२१ पशुधनाची नोंद आहे.
चाऱ्याची गरज आणि आव्हाने:
जिल्ह्यातील पशुधनासाठी दररोज १९७९.२६ मेट्रिक टन, तर महिन्याला ५९ हजार ३७७ मेट्रिक टन चाऱ्याची गरज भासणार आहे. सध्या बांधावरील वैरण, वनक्षेत्रातील गवत आणि कृषी अवशेषांमधून ३ लाख ९९ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध दिसत असला, तरी कडक उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची प्रचंड टंचाई निर्माण होते. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने आत्तापासूनच ५ कलमी धडक उपाययोजनांची आखणी केली आहे. . रब्बी हंगामात चारा उत्पादन वाढीसाठी शासनाकडे ३० लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी. जिल्हा वार्षिक योजनेतून ५० लाख रुपयांचे दर्जेदार वैरण बियाणे वाटप. विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पातून उर्वरित २.६३ लाख रुपयांचे बियाणे वाटप. वन विभागाच्या सहकार्याने राखीव वनक्षेत्रातील गवत व चारा सुरक्षित साठवणे. ज्वारी, बाजरी, मका आणि बरसीम यांसारख्या कमी पाण्यात झपाट्याने वाढणाऱ्या वैरण बियाण्यांचे शेतकऱ्यांना मोफत वाटप करून गावोगावी तात्पुरते पाण्याचे हौद व पाण्याच्या टाक्यांचे नियोजन.
………………………………………………………………………………..
“दुष्काळात माणसांसोबतच मुक्या पशुधनाचेही हाल होऊ नयेत, यासाठी वेळेआधीच हा व्यापक आराखडा तयार ठेवला आहे. चारा छावण्या उघडण्याची पाळी येऊ नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून तालुका स्तरावर पशुसंवर्धन विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.”
— मंदार पत्की, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गोंदिया
………………………………………………………………………………..
“टंचाई निवारण आढावा बैठकीत सर्व बाजूंचा विचार करून जिल्हा नियोजन समितीमधून अतिरिक्त निधीची तरतूद केली आहे. येत्या काळात राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिक, शेतकरी आणि पशुधन या सर्वांना दुष्काळात पूर्ण दिलासा दिला जाईल.”
— इंद्रनील नाईक, पालकमंत्री, गोंदिया जिल्हा

