Zp School: जीर्ण इमारतीत बसून विद्यार्थी घेतात शिक्षण
विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका!
शिक्षण विभागाचा असंवेदनशीलपणा;
मगरडोह जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
देवरी ( गोंदिया ) : तालुक्यातील ग्राम मगरडोह येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्या जीर्ण झाल्याने त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वर्ग खोल्यांना अखेरची घरघर आली असून मगरडोह शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागाचा असंवेदनशील कारभार चव्हाट्यावर आला आहे.

नवीन शैक्षणिक 2025- 2026 सत्राला नुकतीच सुरुवात झाली. देवरी तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागातील 11 केंद्र असून, पालांदूर केंद्रांतर्गत येणारी ग्राम मगरडोह येथील मराठी शाळेत विद्याथ्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. या शाळेत एक ते चार वर्गातील 35 विद्यार्थी घडे गिरवण्यात सुरुवात केली आहे. येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उन्ह, वारा, पाऊस, थंडी यापासून बचाव करण्यासाठी सुसज्ज अशा इमारतींची गरज आहे. परंतु, या शाळेची इमारत जुनी असून जीर्ण झाली आहे. त्याठिकाणी नवीन इमारतीची गरज असताना शिक्षण विभाग याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे इमारत धोकादायक बनली आहे. मगरडोह येथील शाळेच्या वर्ग खोल्या जीर्ण झाली असून, शिक्षकांसह चिमुकले विद्यार्थी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या वाचनालय तसेच व्यायाम शाळेत शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. मगरडोह येथील शाळेच्या इमारतीचाच प्रश्न नव्हेतर, तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेवर गदा येत असताना प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. धोकादायक वर्ग खोल्यांचे पाडकाम करून नवीन इमारत उभारणे, शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती करणे आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित व सुसज्ज वातावरण उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.
————————
नवीन इमारतीची मगरडोह वाशीयांची मागणी
शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे आज मराठी शाळामधील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटली आहे. त्यामुळे पालकांचा खाजगी शाळांकडे कल वाढला आहे. कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट बांधकाम करण्यात आल्याने या वर्ग खोल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास धोकादायक बनल्या आहेत. अनुचित घटना घडल्यास त्याला तालुका शिक्षण विभाग जबाबदार राहील. मगरडोह येथील शाळेला तत्काळ नवीन इमारतीची मागणी ग्रामवासियांनी केली आहे. अन्यथा, शाळेत एकही विद्यार्थी पाठवणार नाही. अशी मगरडोहवाशियाची भूमिका आहे.

