LatestNewsगुन्हेवार्तागोंदिया- भंडारा

फुलचूर येथील जबरी चोरीचा १२ तासांत उलगडा

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोन आरोपी अटकेत, २७.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया :
शहरातील फुलचूर परिसरात घडलेल्या थरारक जबरी चोरी प्रकरणाचा गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत यशस्वी छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून  सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी व मोबाईल फोन असा एकूण २७ लाख ६६ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२५ जानेवारी २०२६ रोजी रात्री अंदाजे ९.३० वाजताच्या सुमारास शिवाजीनगर, साई मंडळी कॉलनी, फुलचूर, गोंदिया येथे फिर्यादी व त्यांच्या आई घरात असताना दोन अज्ञात इसमांनी घराचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताच आरोपींनी चाकूचा धाक दाखवत घरात जबरदस्तीने प्रवेश केला. आरोपींनी घरातील कपाट उघडून सुमारे १३१ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४८ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लुटली व दोघांना जीवे मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक गोरेख भामरे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असताना आरोपी शिवाजीनगर परिसरातच लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी मुकुंदराम डोंगर (वय ५१) व आयुष मुकुंदराम डोंगर (वय २४), रा. साई मंडळी कॉलनी, फुलचूर यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून विविध सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोख २८ हजार रुपये, चोरीस वापरलेली अक्टिव्हा स्कूटर  तसेच दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. सदर कारवाई  पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती वनीता सायकर, पोलीस हवालदार संजय चव्हाण, दिक्षितकुमार दमाहे, रियाज शेख, इंद्रजित बिसेन, प्रकाश गायधने, सुबोधकुमार बिसेन तसेच पोलीस शिपाई छगन विठ्ठले, राकेश इंदुरकर व चा.पो.शि. घनश्याम कुंभलवार यांनी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *