गोंदिया-भंडारा महामार्गावर ‘बंटी-बबली’चा खंडणीचा गोरखधंदा पोलिसांच्या नावे वाहनचालकांची उघड्या माथ्याने लूट!
कथित युट्यूब पत्रकार अन् राजकीय पदाधिकारी पत्नीचे कारनामे ऑनलाईन व्यवहारांचे स्क्रीनशॉट आले समोर
गोंदिया/भंडारा : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर सध्या एका कुप्रसिद्ध ‘बंटी-बबली’ दाम्पत्याच्या खंडणीखोरीची आणि बेधडक वसुलीची जोरदार चर्चा रंगली आहे. जनावरांची (पशुधन) वाहतूक करणाऱ्या वाहनांना रस्त्यात अडवून, कायदा आणि पोलिसांच्या खाकी वर्दीचा धाक दाखवत दरमहा लाखोंची हप्तावसुली करण्याचा गोरखधंदा या दाम्पत्याने सुरू ठेवला आहे. एका पीडित महिलेने या दाम्पत्याच्या जाचाला कंटाळून थेट पुरावे समोर आणले असून, दबाव टाकून उकळण्यात आलेल्या रकमेचे ऑनलाईन व्यवहारांचे (Online Transactions) थेट स्क्रीनशॉट्स उघड झाल्याने या तोतया वसुलीबाज दाम्पत्याचे बिंग फुटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या जोडीतील पती स्वतःला एका युट्यूब चॅनलचा पत्रकार असल्याचे सांगतो, तर पत्नी एका प्रमुख राजकीय पक्षाची स्थानिक पदाधिकारी असल्याचा रुबाब झाडते. पतीच्या हातात युट्यूब कॅमेऱ्याचा धाक आणि पत्नीच्या खांद्यावर राजकीय पक्षाचा झेंडा; याच संगनमताच्या जोरावर हे दाम्पत्य गेल्या काही काळापासून महामार्गावर समांतर ‘वसुली नाका’ चालवत असल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, कोहमरा, देवरी, सालेकसा या पट्ट्यापासून ते थेट भंडारा जिल्ह्यातील पवनी परिसरापर्यंत या जोडीचे जाळे पसरले आहे. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवण्यासाठी हे दोघे दुचाकी व चारचाकी वाहनाने सातत्याने गस्त घालत असतात.
कॅमेऱ्याचा धाक अन् पोलिसांच्या नावे उघड खंडणी
पशुधनाची वाहतूक करणारे एखादे वाहन महामार्गावरील निर्जन वळणावर दिसताच हे दाम्पत्य त्याचा पाठलाग करून गाडी अडवते. वाहनाचा मार्ग अडवून थेट तोंडावर कॅमेरा लावला जातो. “गाडीत गोवंश भरलेले असून कत्तलीसाठी नेले जात आहेत; आम्ही लगेच पोलीस ठाण्यात फोन करून गाडी कायमची जप्त करू आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करायला लावू,” अशी थेट धमकी वाहनचालकांना दिली जाते. चालकाला धमकावून वाहनाच्या मालकाशी संपर्क साधला जातो आणि “स्थानिक पोलीस ठाण्यापासून ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत आमचे थेट संबंध आहेत,” असा मोठा तोरा मिरवत प्रकरण दाबण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी मागितली जाते. रोख रक्कम उपलब्ध नसल्यास थेट ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले जाते.
ऑनलाईन व्यवहारांच्या स्क्रीनशॉटने फुटले बिंग
काही पीडित वाहनमालकांनी या धमक्यांना घाबरून लाखो रुपयांची खंडणी दिली असून, त्यातील ऑनलाईन व्यवहारांचे स्क्रीनशॉट्स आता पुरावा म्हणून समोर आले आहेत. पोलिसांचा धाक आणि बदनामीच्या भीतीने अनेक वाहनमालकांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे टाळले असले, तरी या युट्यूब पत्रकार पती आणि राजकीय पदाधिकारी पत्नीची संपूर्ण कुंडली, त्यांनी वापरलेली वाहने आणि पवनीपर्यंत पसरलेली सूत्रे आता उघड झाली आहेत.
पत्रकारितेचा बुरखा पांघरून आणि राजकीय पदाचा गैरवापर करून महामार्गावर अवैध वसुलीचा धुडगूस घालणाऱ्या या ‘बंटी-बबली’ दाम्पत्यावर गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी स्वतःहून दखल (Sua Sponte) घेऊन खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे कडक गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांमधून जोर धरत आहे.

