दुष्काळाचा कहर! नागभीड तालुक्यात हताश शेतकऱ्यांनी उभ्या धानपिकावर फिरवले ट्रॅक्टर
पावसाने पाठ फिरवल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील तुकूम येथील हृदयद्रावक घटना; हजारो रुपयांचा खर्च वाया
नागभीड / तळोधी (बा.) : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात दुष्काळाची तीव्रता भीषण रूप धारण करत असून, ऐन हातातोंडाशी आलेले उभे पीक करपल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. पिकांची ही दैनावस्थेची आणि करपलेली अवस्था पाहून तीव्र नैराश्यात आलेल्या येथील शेतकऱ्यांनी चक्क आपल्या शेतातील उभ्या धान पिकावर ट्रॅक्टर (रोटाव्हेटर) फिरवून ते नष्ट केल्याचा अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावणारा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील तुकूम गावातील दोन शेतकऱ्यांनी अनुक्रमे तीन आणि अडीच एकरांतील संपूर्ण पिक रोटाव्हेटर फिरवून मातीत मिळवले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, तुकूम गावातील शेतकरी माणिक धर्माजी दोहितरे यांची तीन एकर शेती असून, त्यांनी यंदाच्या हंगामात शेतात चिन्नोर जातीच्या धानाची लागवड केली होती. शेतीच्या मशागतीपासून ते लागवडीपर्यंत त्यांना सुमारे ७० ते ७५ हजार रुपयांचा खर्च आला होता. त्यांची संपूर्ण शेती कोरडवाहू असल्यामुळे पिकाची मदार पूर्णपणे पावसावरच होती. शेतात सिंचनासाठी एक छोटीशी बोडी असली, तरी यंदा अत्यल्प पावसामुळे तीही अगोदरच आटली. त्यामुळे पिकाला दुसरे पाणी देणे अशक्य झाले आणि परिणामी, तीन एकरांतील संपूर्ण धानपीक करपून गेले. हातात काहीच येणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर, २४ ऑक्टोबर रोजी हताश झालेल्या दोहितरे यांनी आपल्या शेतातील करपलेल्या पिकावर रोटाव्हेटर फिरवून ते पूर्णपणे नष्ट केले.
कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता
दोहितरे यांच्या कुटुंबात वृद्ध वडील आणि दोन मुले असून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह याच शेतीवर चालतो. यंदाच्या हंगामासाठी त्यांनी सोसायटीकडून तब्बल ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. पीक पूर्णपणे वाया गेल्याने आता या कर्जाची परतफेड कशी करावी आणि कुटुंबाचा खर्च कसा भागवावा, या विवंचनेत हे कुटुंब सापडले आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे या गावातील सुमारे दीडशे शेतकऱ्यांचे २०० ते २५० एकरांतील पीक धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे.
दुसऱ्या दिवशी आणखी एका शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल
माणिक दोहितरे यांच्या शेतात ट्रॅक्टर फिरविण्याच्या घटनेची शाई वाळत नाही तोच, दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी तुकूम येथील ६४ वर्षीय शेतकरी अशोक मुकरू बनकर यांनीही आपल्या अडीच एकर शेतातील करपलेल्या धानपिकावर रोटाव्हेटर फिरवून ते नष्ट केले. बनकर यांनी यंदा ‘परभणी चिन्नोर’ जातीच्या धानाची लागवड केली होती. स्वतःकडील पैशांसह इतर ठिकाणांहून जुळवाजुळव करून त्यांनी सुमारे ८० हजार रुपये खर्च करून पीक उभे केले होते. मात्र, पावसाच्या लहरीपणाने आणि सिंचनाच्या अभावाने त्यांचेही संपूर्ण पीक जळून खाक झाले. डोळ्यांसमोर पीक उद्ध्वस्त झाल्याचे दुःख सहन न झाल्याने त्यांनी शेत मोकळे करण्याचा हा टोकाचा निर्णय घेतला. बनकर यांच्या कुटुंबात सहा सदस्य असून या संकटाने त्यांच्याही कुटुंबासमोर जगण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

