LatestNewsगोंदियाविदर्भ

गुरू-शिष्याच्या नात्याला पुन्हा काळीमा! लंबाटोला येथे विकृत शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग!

डांगोरलीतील जुन्या गुन्ह्यानंतरही प्रशासनाकडून मेहेरबानीसंतप्त ग्रामस्थांची रावणवाडी पोलिसांत धाव!

गोंदिया : विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या आणि समाजाला दिशा दाखवणाऱ्या शिक्षकानेच पुन्हा एकदा गुरू-शिष्याच्या अत्यंत पवित्र नात्याला काळीमा फासल्याचा संतापजनक व धक्कादायक प्रकार गोंदिया तालुक्यात उघडकीस आला आहे. गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या लंबाटोला (गिरोला) येथील प्राथमिक शाळेतील विकृत शिक्षक संजय अग्रवाल याने एका अल्पवयीन चिमुकल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. या विकृत कृत्यामुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रावणवाडी पोलीस ठाणे गाठून आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.यापूर्वी डांगोरलीतही नोंदवला होता पॉक्सो अंतर्गत गुन्हा!संशयित आरोपी शिक्षक संजय अग्रवाल याच्या विकृत वर्तनाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तालुक्यातील डांगोरली येथे कार्यरत असतानाही त्याने अशाच प्रकारे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता व त्याच्यावर रीतसर गुन्हा दाखल झाला होता. गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊनही शिक्षण विभागाने त्याच्यावर कडक बडतर्फीची कारवाई न करता केवळ बदल्यांचा खेळ मांडल्यानेच या विकृत शिक्षकाचे धाडस वाढले आणि लंबाटोला येथे पुन्हा त्याने चिमुकलीचा बळी घेण्याचा प्रयत्न केला, असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.रावणवाडी पोलिसांत गुन्हा दाखल; अटकेची मागणी:घटना उघडकीस येताच लंबाटोला (गिरोला) येथील ग्रामस्थ व पालक संतप्त झाले. त्यांनी तातडीने रावणवाडी पोलीस ठाणे गाठून आरोपी शिक्षकावर कठोर कलमान्वये (पॉक्सो कायद्यांतर्गत) तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ गजाआड करण्याची जोरदार मागणी केली. रावणवाडी पोलिसांनी पीडित मुलगी व तिच्या पालकांचा जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई व अटकेची प्रक्रिया सुरू केली आहे.गटशिक्षणाधिकाऱ्यांची भूमिका; बडतर्फीची मागणी जोर धरू लागली:या संदर्भात गोंदिया पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एम. एल. मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता, पोलिसांची कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्यानंतर आणि पंचायत समितीकडे अधिकृत तक्रार प्राप्त झाल्यावर सदर नराधम शिक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे तात्काळ पाठवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अशा वारंवार गुन्हे करणाऱ्या शिक्षकाला सेवेतून थेट बडतर्फ (Permanent Dismissal) करण्याची ठाम मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *