साकोली पोलिसांची हायवेवर धडक कारवाई; ९ लाखांचा सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त, दोघांवर गुन्हे दाखल!
शेंदूरवाफा येथे पोलिसांनी रचला सापळा; मारुती इको कारमधून चालली होती चोरटी वाहतूक, गोदामावरही टाकला छापा
पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या आदेशाने मोठी कारवाई; गुटखा माफियांचे धाबे दणाणले
भंडारा/साकोली : राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध साठवणुकीसह वाहतूक करणाऱ्या माफियांच्या विरोधात साकोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शेंदूरवाफा येथे पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलने सापळा रचून सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणारी एक मारुती इको गाडी रंगेहाथ पकडली. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी दोन बड्या व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे साकोली आणि परिसरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.नाकाबंदीदरम्यान ‘इको’ कारचा संशय आला अन्…मिळालेल्या माहितीनुसार, ९ जून २०२६ रोजी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली साकोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार महादेव आचरेकर आणि त्यांच्या पथकाने शेंदूरवाफा येथे कडक नाकाबंदी केली होती. यावेळी हायवेवरून जाणाऱ्या एका संशयास्पद मारुती इको गाडीला (क्र. एमएच ३५ एआर ७१६५) पोलिसांनी थांबवून तिची तपासणी केली. गाडीची झडती घेतली असता पोलिसांचे डोळेच पांढरे झाले. या गाडीमध्ये गोण्यांमध्ये भरलेला प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ गाडीचालक मोहित मदन कापसे (वय ३०, रा. देवरी) याला ताब्यात घेतले आणि गाडीतून ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलीस थेट व्यापाऱ्याच्या घरात घुसले!गाडीचालक मोहित कापसे याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, हा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूचा साठा साकोली येथील व्यापारी तरुण राजकुमार मल्लानी (वय ४०) याच्याकडे पोहोचवला जाणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेळ न घालवता थेट व्यापारी तरुण मल्लानी यांच्या साकोली येथील घरावर छापा टाकला. घराची झाडती घेतली असता तेथेही ५ हजार रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू आढळून आला.एकूण ९ लाखांचा मुद्देमाल जप्त!पोलिसांनी या संपूर्ण कारवाईत मारुती इको गाडी, सुगंधित तंबाखू आणि गुटखा असा एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या ‘खाकी’ शिलेदारांनी फत्ते केली कामगिरीही यशस्वी आणि धडक कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे, ठाणेदार महादेव आचरेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडुले, तसेच पोलीस अंमलदार दिनेश तिजारे, मिलिंद बोरकर, सचिन कापगते आणि लोकेश कोटवार यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास साकोली पोलीस करत आहेत.

