पोटाला, पाठीला आणि पायांना गांजा चिकटवून तस्करी
एलसीबीने गोंदियात उधळला मध्यप्रदेशातील तस्करांचा अजब कट टिफिनच्या डब्यांतूनही गांजा जप्त, १ लाख ६८ हजारांचा ऐवज हस्तगत!
गोंदिया : आगामी सण-उत्सवांच्या काळात गोंदिया शहरात अंमली पदार्थांचे जाळे पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्यीय तस्करांचा एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) उघडकीस आणला आहे. शरीराला प्लास्टिकच्या पट्ट्यांनी गांजा गुंडाळून आणि जेवणाच्या टिफिन डब्यात अमली पदार्थ लपवून दुचाकीवरून बेधडक तस्करी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन सराईत तस्करांना पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान रंगेहात बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी २ किलो ९१५ ग्रॅम ओला गांजा, एक प्लॅटिना मोपेड आणि इतर साहित्यासह एकूण १ लाख ६८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे, अमली पदार्थांचा साठा आणि आंतरराज्यीय तस्करीविरोधात कठोर मोहीम राबवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक २५ ऑक्टोबरच्या रात्री गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्याचवेळी रेल्वे स्टेशन, रेलटोली परिसरातून दोन संशयित इसम दुचाकीवरून विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर गांजा घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी रेलटोली ते शासकीय विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अत्यंत चोख आणि गोपनीय नाकाबंदी केली. काही वेळातच एक प्लॅटिना मोपेड संशयास्पदरीत्या येताना दिसली. पोलिसांनी तात्काळ वाहन अडवून दोघांना ताब्यात घेतले आणि विचारपूस केली असता, त्यांनी गोमाजी भागन चौधरी (वय ५२) आणि लक्ष्मीचंद बघेले (वय ५२, दोघे रा. शिवणघाट, जि. बालाघाट, मध्यप्रदेश) अशी आपली नावे सांगितली.
पोलिसांनी पंचांसमक्ष या दोघांची झडती घेतली असता समोर आलेला प्रकार पाहून पोलीस अधिकारीही अवाक झाले. आरोपींनी घातलेले जॅकेट काढून पांढऱ्या शर्टाचे बटन उघडले असता, त्यांच्या पोटावर, पाठीला आणि दोन्ही पायांना प्लास्टिकच्या पट्ट्यांच्या साह्याने गांजा घट्ट चिकटवून लपवण्यात आला होता! पोलिसांनी हे प्लास्टिक कापून पाहिले असता त्यात पाने, फुले व बिया मिश्रित हिरवा ओलसर गांजा आढळला. याशिवाय, आरोपींच्या हातातील पिशवीत असलेल्या तीन टिफिन डब्यांची तपासणी केली असता, त्यातही जेवणाच्या नावाखाली गांजा भरून ठेवल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून १ लाख ४५ हजार ७५० रुपये किमतीचा २ किलो ९१५ ग्रॅम ओलसर गांजा, २० हजार रुपयांची प्लॅटिना मोपेड आणि अडीच हजार रुपयांचे इतर साहित्य असा एकूण १ लाख ६८ हजार २५० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपींना रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात सपोनि अमरदीप खाडे, सफौ राजू मिश्रा, पोहवा तुलसीदास लुटे, महेश मेहर, प्रकाश गायधने, पोशि राकेश इंदूरकर, कुणाल बारेवार, निखिल मेश्राम आणि चापोशि राम खंदारे यांनी बजावली. मध्यप्रदेशातून चालणाऱ्या या अंमली पदार्थांच्या पुरवठ्याची पाळेमुळे शोधून काढण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

