तिरोड्यात अवैध हातभट्टीची दारू विकणाऱ्या तिघांना १ महिन्यासाठी हद्दपार
सण-उत्सवांत गोंधळ घातल्यास थेट जिल्ह्याबाहेर!
पोलिसांच्या दणक्याने दारू माफियांचे धाबे दणाणले!
तिरोडा (गोंदिया): आगामी सण-उत्सवांच्या काळात शांतता भंग करणाऱ्या आणि गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या अवैध धंदेवाईकांवर तिरोडा पोलिसांनी कायद्याचा भक्कम बडगा उगारला आहे. तिरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेधडकपणे अवैध हातभट्टीची दारू गाळून विक्री करणाऱ्या तीन सराईत दारूविक्रेत्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ५६ अन्वये थेट एका महिन्यासाठी हद्दपारीची (तडीपारीची) कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे परिसरातील गावठी दारू माफियांचे धाबे पुरते दणाणून गेले आहेत.
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये विशाल उर्फ यशवंत धर्मकीर्ती सूर्यवंशी (वय ३८, रा. मेहंदीपूर, ता. तिरोडा), अहिंसात विठोबा सूर्यवंशी (वय ५३, रा. मेहंदीपूर, ता. तिरोडा) आणि अनिल नानाजी कुकडे (वय ३२, रा. गुंडीटोला करटी, ता. तिरोडा) या तिघांचा समावेश आहे. संबंधित इसम परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध हातभट्टीची विषारी दारू विकत होते. परिणामी गावात दररोज दारूच्या नशेत मारामारी, कौटुंबिक कलह आणि महिलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. अनेक गरिबांचे संसार या दारूच्या विळख्याने उद्ध्वस्त झाले होते. यापूर्वीही पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाया केल्या होत्या; मात्र त्यांच्या मुजोर वर्तनात कोणतीही सुधारणा न होता त्यांचे काळे धंदे बिनदिक्कतपणे सुरूच होते.
आगामी दिवाळीसह विविध सण-उत्सवांच्या काळात गावातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि समाजकंटकांवर पोलिसांचा वचक बसावा, यासाठी अखेर या तिघांनाही एका महिन्यासाठी हद्दपार करण्याचा अंतिम आदेश जारी करून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे.
ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुल्हाने, एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत तिरोडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमित वानखडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा प्रकाश गायधने, पोलीस अंमलदार छगन विठ्ठले, प्रतिबंधक कारवाई अंमलदार पोशि कैलास ठाकरे तसेच एसडीपीओ कार्यालयाचे पोहवा नितेश गोस्वामी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सण-उत्सवाच्या काळात अशा अवैध धंद्यांची गय केली जाणार नसून आणखी कडक पावले उचलली जातील, असा सज्जड दम पोलिसांनी दिला आहे.

