पैशांच्या वादातून सख्ख्या आजीची निर्घृण हत्या; टोमण्यांचा राग आल्याने नातवाचे भयानक कृत्य
■ ऑनलाईन चाकू मागवून मध्यरात्री केला हल्ला
■ पाचपावली पोलिसांची कारवाई; आरोपी नातू अटकेत
नागपूर : बँक खात्यातून परस्पर वीस हजार रुपये काढल्याच्या कारणावरून आजीने ‘चोर’ म्हटले आणि सतत टोमणे मारले. या गोष्टीचा राग आल्याने एका २४ वर्षीय तरुणाने स्वतःच्या सख्ख्या (चुलत) आजीची धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. हत्येनंतर मृतदेह घरात कोंडून आरोपी फरार झाला होता. ही थरारक घटना नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लष्करीबाग परिसरात उघडकीस आली असून, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
इंदू किशोर चव्हाण (वय ६८, रा. लष्करीबाग) असे मृत आजीचे नाव आहे. तर राज बागडे (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी नातवाचे नाव आहे. लष्करीबाग सारख्या ‘सिव्हिल’ समजल्या जाणाऱ्या भागात ही घटना घडल्याने परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, इंदू चव्हाण या धम्म उपासिका होत्या. त्यांचे पती किशोर खालील मजल्यावर राहतात, तर इंदू या शिलाई मशीनचे काम करत असल्याने त्या वरच्या मजल्यावर राहायच्या. त्यांचा मुलगा आणि सून नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. शेजारीच राहणारा त्यांचा चुलत नातू राज याचे त्यांच्याकडे नेहमी येणे-जाणे होते. तो सध्या बेरोजगार होता. काही दिवसांपूर्वी राजने आजीला फसवून तिच्या बँक खात्यातून तिला न सांगता २० हजार रुपये काढले होते. हा प्रकार उघडकीस आल्यावर आजी इंदू यांना प्रचंड राग आला. त्यांनी राजला फटकारत त्याला ‘चोर’ म्हटले. या घटनेनंतर त्या वारंवार त्याला टोमणे मारत होत्या. हे शब्द राजच्या जिव्हारी लागले आणि संतापाच्या भरात त्याने आजीला संपवण्याचा कट रचला.
ऑनलाईन चाकू मागवून मध्यरात्री केला हल्ला
राजने हत्येसाठी चक्क ऑनलाईन चाकू मागवला. घटनेच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास तो आजीच्या खोलीत शिरला. त्यावेळी इंदू चव्हाण या कपडे शिवत बसल्या होत्या. आजी काही बोलेल त्याआधीच राजने तिच्या गळ्यावर आणि नंतर छातीवर व पोटावर चाकूने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आजीला आरडाओरड करण्याचीही संधी मिळाली नाही आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्या.
मृतदेह ओढत बाथरूममध्ये लपवला
अनेक वार केल्यामुळे रक्ताचे शिंतोडे भिंत, छत आणि फरशीवर उडाले. आजी मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर काय करावे या विचारात तो काही वेळ थांबला. त्यानंतर त्याने मृतदेह फरशीवरून ओढत बाथरूमच्या दिशेने नेला. बाथरूमच्या दाराला बाहेरून कुलूप लावून त्याने घटनास्थळावरून पोबारा केला.
असा उघडकीस आला प्रकार
शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे वरच्या खोलीचे दार उघडले गेले नाही, शिवाय बाहेरून कुलूप असल्याचे पती किशोर यांच्या लक्षात आले. ती कुठे गेली असावी असा त्यांचा अंदाज होता, मात्र शंका आल्याने त्यांनी वर जाऊन कुलूप उघडले. समोर पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. या हत्येची बातमी सकाळी १० वाजताच्या सुमारास वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची मोठी गर्दी झाली.
माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपी राज बागडे याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

