LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

रेंगेपार प्रकल्पाचे पाणी कालव्यातून थेट नाल्यात

दुष्काळाच्या सावटात पाण्याचा सर्रास अपव्यय
पाटबंधारे विभाग व पाणी वापर संस्थांचे दुर्लक्ष
सडक अर्जुनी ( गोंदिया) :
तालुक्यातील रेंगेपार (गौरीडोह) जलाशय मध्यम प्रकल्पाचा मुख्य कालवा पाच किलोमीटर असून, लेडेंझरी येथील कॅनलद्वारे धानोरी, कोसमतोंडी, चिचटोला आणि मुंडिपार (ई.) परिसरातील शेतीला सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो. मात्र, लांडेंझरी येथील हा कालवा मागील पाच वर्षांपासून फुटलेला असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. या गंभीर प्रकाराकडे संबंधित पाटबंधारे विभाग आणि पाणी वापर संस्थांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे. ऐन दुष्काळाच्या काळात पाण्याचा अपव्यय होत असल्याने विभागाचा कारभार चर्चेत आला आहे.
रेंगेपार (गौरीडोह) जलाशय मध्यम प्रकल्पांतर्गत लेडेंझरी, मुरपार, धानोरी, चिचटोला, कोसमतोंडी आणि मुंडिपार (ई.) ही गावे येतात. या जलाशयाद्वारे सुमारे १००० हेक्टर क्षेत्रातील शेती ओलिताखाली आणली जाते. या प्रकल्पातील पाण्याच्या योग्य नियोजनासाठी व देखभालीसाठी चार पाणी वापर समित्या आणि एक मुख्य समिती गठीत करण्यात आली आहे. एकीकडे परिसरात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असताना, दुसरीकडे गत जच वर्षांपासून या प्रकल्पाचे मोलाचे पाणी कालव्यातून थेट नाल्याला वाहून जात आहे.
प्रशासन आणि पाटबंधारे विभाग कागदावर सर्व काही उत्तम असल्याचे दाखवून जनतेला पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचे धडे देत असते. मात्र, डोळ्यांदेखत हजारो लिटर पाणी वाया जात असताना अधिकारी व समितीचे अध्यक्ष तिकडे फिरकतही नाहीत. कागदावर आलबेल दाखवणार्‍या प्रशासनाने भरून वाहणार्‍या पाण्याचे महत्त्व न समजणे कितपत योग्य आहे? असा सवाल संतप्त शेतकरी विचारत आहेत. पिढ्यानपिढ्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही परंपरा जपणारा शेतकरी या अनास्थेमुळे हवालदिल झाला आहे. याकडे लक्ष देवून पाण्याची नासाडी त्वरित थांबवावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.
…………………….
वरिष्ठ अधिकार्‍यांनी दखल घ्यावी
दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनेची कामे हाती घेण्यात आली आहे. यासाठी जल व्यवस्थापनाला प्राधान्य दिले जात आहे. असताना रेंगेपार (गौरीडोह) जलाशय मध्यम प्रकल्पांतर्गत पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी सुरू आहे. हा प्रकार सुरू असतानाही पाटबंधारे विभागाचे अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी व जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन फुटलेल्या कालव्याची योग्य दुरुस्ती करावी, अशी मागणी लेडेंझरी, धानोरी, कोसमतोंडी, मुरपार व परिसरातील बाधित शेतकर्‍यांनी केली आहे.
………………….
या ठिकाणी मुख्य अधिकारी कोण आहेत हेच कोणाला समजत नाही. चार समित्यांचा मुख्य अध्यक्ष असलो तरी आम्हाला मर्यादा आहेत. ही दुरुस्ती प्रशासनाकडून (पाटबंधारे विभागाकडून) होणे अपेक्षित आहे. शासनाने समित्या गठीत करून केवळ वसुलीचे काम आमच्याकडे सोपविले आहे, मात्र या अत्यल्प निधीतून एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करणे शक्य नाही.

  • डॉ.दिलीप मारोती कापगते
    मुख्य समितीचे अध्यक्ष
Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *