LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

अदानीच्या गॅस केंद्रातून विषारी उग्र वासाची गळती! ६०० शाळकरी चिमुरड्यांचा जीव टांगणीला

प्रदूषण नियंत्रण मंडळ ढिम्म, संतापाचा उद्रेक झाल्यास आंदोलनाचा भडका!
तुमसर (भंडारा):
उद्योगपतींच्या नफेखोरीपुढे निष्पाप चिमुरड्यांचा आणि नागरिकांचा जीव कवडीमोलाचा ठरवला जात असल्याचा अत्यंत धक्कादायक व संतापजनक प्रकार तुमसर तालुक्यातील तुडका–तामसवाडी परिसरात उघडकीस आला आहे. गेल इंडियाच्या मुख्य पाइपलाइनवरून गॅस वितरण करणाऱ्या अदानी समूहाच्या सीएनजी केंद्रातून गेल्या अनेक दिवसांपासून असह्य असा उग्र व विषारी वास हवेत पसरत आहे. या जीवघेण्या वायुप्रदूषणामुळे अवघ्या २०० मीटर अंतरावर असलेल्या दोन शाळांमधील ६०० हून अधिक निष्पाप विद्यार्थ्यांसह संपूर्ण परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला थेट ५ दिवसांचा अल्टिमेटम देत, ठोस कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा सज्जड इशारा दिला आहे.
अदानीच्या या गॅस वितरण केंद्राच्या अगदी हाकेच्या अंतरावर जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा आणि महर्षी विद्या मंदिर या दोन नामांकित शाळा आहेत. या केंद्रातून किंवा पाईपलाईनच्या जोडणीतून सतत पसरणाऱ्या ‘इथाइल मर्केप्टन’युक्त उग्र वासामुळे चिमुरड्या विद्यार्थ्यांना डोकेदुखी, सतत खोकला, डोळ्यांत व घशात तीव्र जळजळ, मळमळ आणि श्वास घेण्यास त्रास होण्यासारख्या गंभीर व्याधींना सामोरे जावे लागत आहे. शाळेच्या प्राचार्यांनी स्वतः तहसीलदारांकडे धाव घेऊन मुलांच्या जीवाला निर्माण झालेल्या धोक्याबाबत लेखी तक्रार केली आहे. मात्र, नफ्याच्या नशेत बुडालेल्या अदानी कंपनीला आणि संबंधित यंत्रणेला या निष्पाप मुलांचा आक्रोश का ऐकू येत नाही, असा जळजळीत सवाल विचारला जात आहे.
केवळ शाळाच नव्हे, तर लगतच्या परिसरातील सुपीक शेती आणि पिकांवरही या घातक वायूचा विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. २१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) भंडारा उपविभागाकडे ग्रामस्थांनी अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी शुक्रवारी पाहणीसाठी आले खरे; पण त्यांनी एसी गाडीतून उतरून काय तपासणी केली आणि काय नोंदी घेतल्या, याचा कोणताही खुलासा अद्याप केलेला नाही. अधिकाऱ्यांच्या या संशयास्पद मौनामुळे कंपनीशी लागेबांधे आहेत का, अशी संतप्त कुजबूज सुरू झाली आहे.
एखादी मोठी दुर्घटना घडून निष्पाप बालकांचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला पाझर फुटणार आहे का? येत्या ५ दिवसांत या उग्र वासाचे मूळ कारण शोधून संभाव्य गॅसगळतीवर कायमस्वरूपी तोडगा काढला नाही आणि हवेच्या गुणवत्तेचा तांत्रिक अहवाल जाहीर केला नाही, तर अदानी गॅस केंद्राला टाळे ठोकून रस्त्यावर उतरू, असा निर्वाणीचा इशारा तामसवाडी व तुडका परिसरातील संतप्त नागरिक, पालक व शेतकऱ्यांनी दिला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *