नागपूर पुन्हा रक्ताळले! सक्करदऱ्यात सुऱ्याने भोसकून अन् दगडाने ठेचून दोघांची निर्घृण हत्या
मे महिन्यात १४, तर जूनच्या सुरुवातीलाच ३ खून; नागपूर पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला? ‘क्राइम कॅपिटल’कडे वाटचाल!
नागपूर : उपराजधानी नागपुरात गुन्हेगारांनी पोलिसांना उघडे आव्हान दिले असून कायदा व सुव्यवस्थेचे पार धिंडवडे निघाले आहेत. मे महिन्यात तब्बल १४ हत्यांच्या नोंदीने आधीच हादरलेल्या नागपुरात जून महिन्याची सुरुवातही रक्तरंजित ठरली आहे. अवघ्या १० दिवसांत तीन खुनांच्या घटना ताज्या असतानाच, बुधवारी रात्री सक्करदरा परिसरात दोन तरुणांची सुरा मारून आणि दगडाने डोके ठेचून अमानुष हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण नागपूर शहर सुन्न झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आदित्य उर्फ सोनू भोंडवे (वय २५, रा. सोमवारी क्वार्टर) आणि आदित्य राहुलकर (वय २३, रा. बजरंगनगर, मानेवाडा रोड) अशी निर्घृण हत्या करण्यात आलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मृत तरुणांची नावे आहेत.
सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटा ताजबाग ते सक्करदरा मार्गावरील ‘श्री सत्य दरबार बँड पार्टी’च्या कार्यालयासमोर बुधवारी रात्री सुमारे ८:३० वाजताच्या सुमारास हा रक्ताचा खेळ रंगला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन्ही मृत तरुणांना घेरून त्यांच्यावर सपासप सुऱ्याने वार केले. एवढ्यावरच न थांबता, ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर त्यांचे चेहरे आणि डोकी दगडाने ठेचून त्यांची ओळख मिटवण्याचा क्रूर प्रयत्न करण्यात आला. सक्करदरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, मृत आणि आरोपी हे दोन्ही गट फलविक्रीचा (Fruit Selling) व्यवसाय करतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी दरात फळे विकण्याच्या कारणावरून बुधवारी रात्री दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्याचे रूपांतर थेट दुहेरी हत्याकांडाच्या रक्तरंजित थरारात झाले. या घटनेत वैभव उर्फ दादू प्रदीप डोंगरे, वेदांत डबीर, अभी राऊत आणि ऋषी नरेश कुट्टेवार अशी आरोपींची नावे समोर आली आहेत. मुख्य म्हणजे, आरोपी ऋषी कुट्टेवार याच्यावर यापूर्वीच खुनाचे दोन गुन्हे नोंद असून तो मोकाट फिरत होता, हे विशेष!
……………………………………….
मृत आणि आरोपी दोन्ही रेकॉर्डवरील गुन्हेगार!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुहेरी हत्याकांडात जीव गमावलेले आणि हत्या करणारे दोन्ही गटातील तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. मृत आदित्य भोंडवे आणि आदित्य राहुलकर यांच्यावर नागपुरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, प्राणघातक हल्ला (मारहाण) तसेच थेट ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या दोन गटांमधील या टोकाच्य संघर्षाने सक्करदरा परिसर पुन्हा एकदा गँगवॉरच्या छायेत आल्याचे चित्र आहे.
…………………………………….
नागपूर पोलिसांचे ‘इंटेलिजन्स’ फेल की फक्त वसुली चालू?
नागपुरातील गुन्हेगारीचा आलेख चिंताजनक वेगाने वाढत असल्याचे आकडे सांगत आहेत. २ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंगणा मार्गावर अनिता नरगडे (४०) यांची परिचिताने चाकूहून हत्या केली होती, तिथून सुरू झालेला रक्ताचा सडा थांबायला तयार नाही. मे महिन्यातील २८ दिवसांत १४ खून झाले आणि आता जूनच्या पहिल्या १० दिवसांत ३ खुनांची भर पडली आहे. नागपुरात दिवसाढवळ्या आणि गजबजलेल्या भागात सुऱ्या चालतात, डोकी ठेचली जातात, यावरून पोलिसांची गस्त आणि गुन्हेगारांवर असणारा पकड साफ उघडी पडली आहे. वाहतूक पोलिसांना वसुलीतून आणि स्थानिक पोलिसांना इतर ‘उलाढालीं’मधून सवड मिळाल्यास त्यांनी उपराजधानीतील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, अशी संतप्त प्रतिक्रिया भंडारा आणि नागपूरच्या जनतेतून उमटत आहे.

