LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

कॉकरोच जनता पार्टीवर ‘डिजिटल स्ट्राईक’; अधिकृत वेबसाईट भारतात ब्लॉक

संस्थापक अभिजीत दीपके यांचा सरकारवर घणाघात, कारवाईला ठरवले ‘हुकूमशाही’
​इन्स्टाग्रामवर २ कोटींहून अधिक फॉलोअर्सचा होता विक्रम
​शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या याचिकेवर होत्या ६ लाखांच्या स्वाक्षऱ्या
​मुंबई :
सोशल मीडियावर अवघ्या एका आठवड्यात धुमाकूळ घालणाऱ्या आणि देशातील सर्वात मोठा ‘डिजिटल ट्रेंड’ ठरलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ला (CJP) केंद्र सरकारने मोठा दणका दिला आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणाऱ्या या व्यंग्यात्मक डिजिटल राजकीय पक्षाची अधिकृत वेबसाईट भारतात पूर्णपणे ब्लॉक करण्यात आली आहे. यापूर्वी पक्षाचे अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता.
​लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत
या कारवाईपूर्वी कॉकरोच जनता पार्टीने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. पक्षाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तब्बल २.१७ कोटींहून अधिक फॉलोअर्स जोडले गेले होते. विशेष म्हणजे, या आकड्याने सत्ताधारी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडललाही मागे टाकले होते. तर, ‘एक्स’ अकाउंटवर १ लाख ६० हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. या पक्षाचे ऑनलाईन सदस्यत्व घेण्यासाठी तरुणांची अक्षरशः झुंबड उडाली होती. वेबसाईट बंद होण्यापूर्वी देशातील तब्बल १० लाख तरुणांनी पक्षाचे ऑनलाईन सदस्यत्व स्वीकारले होते.
​शिक्षण मंत्र्यांविरोधातील मोहीम भोवली?
शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावर या पक्षाने जोरदार आवाज उठवला होता. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी याच वेबसाईटवरून चालवल्या गेलेल्या ऑनलाईन याचिकेवर अल्पावधीतच तब्बल ६ लाख लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या वाढत्या प्रतिसादामुळेच प्रशासनाने ही कारवाई केल्याची चर्चा तरुणांमध्ये आहे.
​’सरकार झुरळांना इतके का घाबरते?’
वेबसाईट आणि अकाउंट्सवर झालेल्या या कारवाईनंतर पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. “हा सरकारचा निव्वळ हुकूमशाही कारभार आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
​दीपके म्हणाले, “आधी आमचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक करण्याचा प्रयत्न झाला. त्यात अपयश आल्यावर थेट वेबसाईटच बंद पाडली. सरकार झुरळांना (कॉकरोच) इतके का घाबरत आहे? शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावर जाब विचारणे आणि देशातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्याची मागणी करणे, हाच आमचा गुन्हा होता का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
​’कॉकरोच कधीच मरत नाहीत’
तरुणांना धीर देताना दीपके यांनी सरकारला थेट इशारा दिला. “तुम्ही आम्हाला इतक्या सहजासहजी संपवू शकत नाही. आम्ही आमच्या नवीन ‘डिजिटल घरा’चे काम करत आहोत. कॉकरोच कधीच मरत नाहीत,” असे ते म्हणाले. सरकारच्या या कारवाईमुळे सोशल मीडियावर विशेषतः ‘झेन जी’ (Gen Z) आणि तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *