LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

गोरस भंडार बंद करणे वर्धेच्या सामाजिक व आर्थिक हितासाठी घातक

सुधारणेसाठी मुदत देण्याची वर्धेकरांची मागणी!

विनानोटीस सील ठोकल्याने दूध उत्पादक व कामगारांवर उपासमारीची वेळ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मगनवाडीतून निघाला मूक मोर्चा

वर्धा : लोकांच्या विश्वासावर उभी असलेली आणि जवळपास शतकभराची परंपरा जपणारी ‘गोरस भंडार’ ही संस्था बंद होणे, हे वर्ध्याच्या सामाजिक व आर्थिक हितासाठी अत्यंत घातक ठरेल. त्यामुळे याप्रकरणी प्रशासनाने तात्काळ सकारात्मक व न्याय्य निर्णय घेऊन गोरस भंडार पूर्ववत सुरू करावे. तसेच संस्थेच्या कामात काही त्रुटी असल्यास त्या सुधारण्यासाठी कायदेशीर वेळ देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी वर्धेकरांसह गांधी विचारसरणीच्या नागरिकांनी शहरात भव्य मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांना निवेदन दिले.अन्न व औषधी प्रशासनाने (FDA) कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता रविवार, ३१ मे रोजी थेट कारवाई करून गोरस भंडारला पुढील आदेशापर्यंत सील ठोकले. या अचानक केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक, रोजंदारीवर काम करणारे शेकडो कामगार, तसेच गोरस भंडारवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावर थेट उपासमारीचे संकट ओढवले असून, कोणतीही प्रत्यक्ष तक्रार नसताना इतकी मोठी कारवाई करून थेट परवाना रद्द करणे हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे, अशी तीव्र भावना आंदोलकांनी व्यक्त केली. ही कारवाई पूर्णपणे अन्यायकारक असून, प्रशासनाने तातडीने न्याय्य भूमिका घ्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.गोरस भंडारचा हा प्रश्न केवळ एका संस्थेपुरता मर्यादित नसून, तो वर्ध्याच्या अस्मितेचा, सहकार चळवळीच्या भविष्याचा आणि स्थानिक स्वावलंबी अर्थव्यवस्थेच्या संरक्षणाचा प्रश्न आहे. याच भूमिकेतून गोपालक, कर्मचारी, गांधी विचारसरणीचे नागरिक व वर्धेकरांच्या उपस्थितीत मगनवाडी परिसरातील गोरस भंडारपासून या मूक मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गाने शिस्तबद्धरीतीने मार्गक्रमण करून हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचला. येथे सर्व आंदोलक एकत्रित आले आणि त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गोरस भंडार तातडीने सुरू करण्यासाठी साकडे घातले. गोरस भंडार अचानक बंद झाल्यामुळे दूध उत्पादकांच्या अडचणीत मोठी भर पडली असून, दुसरीकडे ग्राहकांनाही घरपोच शुद्ध दूध मिळणे कठीण झाले आहे.या मूक मोर्चात पुरुषांसह महिलांचाही मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग होता. आंदोलनात नगराध्यक्ष डॉ. सुधीर पांगूळ, किसान अधिकार अभियानाचे अविनाश काकडे, जिल्हा सर्वोदय मंडळाचे मंत्री कन्हैया छांगाणी, शालिग्राम टिबडेवाल, धनंजय ढोमणे, विजय मोहता, प्रदीप बजाज, अमित ठाकूर, अमित देशभ्रतार, प्रवीण पेठे, नीरज गुजर, विशाल मानकर, सचिन पहाडे, सिद्धू मून, प्रफुल कुकडे, सुनील मानकर, योगेश मंहतारे, समीर देशमुख, जी. व्ही. ठाकरे, राजीव वानखेडे, मंगेश भोसले, प्रवीण भोयर, डॉ. उदय मेघे, शैलेश सिंघल, छगन बत्रा, नितीन चुडीवाले यांच्यासह मोठ्या संख्येने गोपालक, कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते. वनविभागाच्या आणि प्रशासनाच्या अशा एकतर्फी कारवायांमुळे स्थानिक जनतेमध्ये आता तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *