मुलीच्या वाढदिवशीच वडिलांवर काळाचा घाला; विजेचा धक्का लागून मृत्यू
पवनी तालुक्यातील भोजापूर येथील घटना; महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ अश्विन लोणारे यांचा दुर्दैवी अंत
कोसरा (भंडारा) : घरी लाडक्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे मनात आनंद दाटलेला होता. मात्र दुसरीकडे काळाने वेगळाच डाव साधला. वीज वितरण कंपनीत कार्यरत असलेल्या कर्तव्यावरील पित्याचा शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करताना विजेचा जोरदार धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला.
अश्विन रघुनाथ लोणारे (४३, रा. कोसरा) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना पवनी तालुक्यातील भोजापूर येथील शेतशिवारात गुरुवारी सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान घडली. मुळचे कोसरा येथील असलेले अश्विन लोणारे हे महावितरण विभागामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून सेवेत होते व सध्या पवनी येथे राहत होते.
भोजापूर शेतशिवारातील विद्युत वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळताच ते गुरुवारी सकाळी दुरुस्तीसाठी घरातून निघाले होते. दुरुस्ती करण्यापूर्वी भोजापूर येथील गांधी प्रभागातील मुख्य एबी स्विच बंद करण्यासाठी ते गेले असता, स्विच बंद करत असतानाच त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला व जागीच मृत्यू झाला.
एबी स्विच परिसर झाडीझुडपांनी वेढलेला
भोजापूर येथील गांधी प्रभागातील ज्या भागात हा एबी स्विच आहे, तिथे सध्या मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली आहेत. अनेक नागरिकांचे कुंपणही थेट स्विचच्या परिसरापर्यंत आले आहे. या धोकादायक परिस्थितीमुळेच एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याचा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
गावात व परिसरात हळहळ
अगदी लाडक्या मुलीच्या वाढदिवशीच पित्याचा असा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अश्विन लोणारे यांच्या अकाली जाण्याने गाव व परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.

