LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

सावलीत शोकाकूल वातावरण! दहावीचा विद्यार्थी असोलामेंढा मुख्य नहरात बुडाला

२० तासांच्या शोधानंतर सापडला मृतदेह : मित्रांसह गेला होता पोहायला
सावली (चंद्रपूर):
असोलामेंढा तलावाच्या मुख्य नहरात मित्रांसह पोहायला गेलेला इयत्ता दहावीचा विद्यार्थी नहराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. सुमारे २० तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर मंगळवारी दुपारी या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला. नैतिक विठ्ठल शेडमाके (वय १६, रा. सावली) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो रमाबाई आंबेडकर विद्यालयाचा विद्यार्थी होता.
प्राप्त माहितीनुसार, सोमवार, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता शाळेची सुट्टी झाल्यानंतर नैतिक आणि त्याचे इतर ५ मित्र सिंचन विभागाला लागून असलेल्या असोलामेंढा तलावाच्या मुख्य नहरात पोहण्यासाठी गेले होते. सायंकाळ होऊनही नैतिक घरी न परतल्याने त्याच्या आईने मित्रांशी संपर्क साधला, मात्र सुरुवातीला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने नातेवाईकांनी सावली पोलीस ठाण्यात तोंडी माहिती दिली. त्यानंतर मित्रांकडे अधिक विचारपूस केली असता, नैतिक नहराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याचे समोर आले.
अशी राबवली शोधमोहीम:
घटनेची माहिती मिळताच मंगळवारी पहाटेपासूनच पोलीस विभाग, तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन पथक आणि चंद्रपूर येथील विशेष रेस्क्यू टीमच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू करण्यात आली. अखेर ११ ऑगस्ट (मंगळवार) रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास मूळ तालुक्यातील गडिसुर्ला समोर नहराच्या पात्रात नैतिकचा मृतदेह आढळून आला.
एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबावर शोककळा:
मृत नैतिक हा शेडमाके कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे शेडमाके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण सावली परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
असोलामेंढा नहर ठरतोय जीवघेणा!
सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतातील रोवणीच्या कामासाठी गोसेखुर्द अंतर्गत असोलामेंढा तलावाचे पाणी नहरात सोडण्यात आले आहे. मात्र, या मुख्य नहराच्या काठावर सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना किंवा फलक लावण्यात आलेले नाहीत. सुरक्षेचा अभाव आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे या नहरात बुडून जीव गमावण्याच्या घटना वारंवार घडत असून, शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा नहर नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *