स्वतःच्या ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अखेर जन्मठेप !
प्रतापगडच्या उमेश रामटेकेला दोन स्वतंत्र गुन्ह्यांत न्यायालयाचा दणका
केशोरी पोलिसांच्या तपासाला मोठे यश!
केशोरी (गोंदिया) : नात्याला काळीमा फासणाऱ्या आणि रक्ताच्या नात्याची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या एका नराधम बापाचे पाप अखेर चव्हाट्यावर आले असून, न्यायालयाने त्याला थेट जन्मठेपेची अद्दल घडवली आहे. पोटच्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी लैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग करणाऱ्या उमेश राजू रामटेके (वय ३६, रा. प्रतापगड, ता. अर्जुनी मोरगाव) या विकृत आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने (DJ-3) दोन वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांत एकाच दिवशी दोषी ठरवून कठोर शिक्षेची सुनावणी केली. एका गुन्ह्यात त्याला मरेपर्यंत जन्मठेप, तर दुसऱ्या गुन्ह्यात सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
केशोरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ५७/२०२५ मधील हकीकत अंगावर काटा आणणारी होती. या पाषाणहृदयी नराधमाने स्वतःच्या नऊ वर्षांच्या निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. इतकेच नव्हे, तर जन्मदात्या आईवर जबरदस्ती करून तिला व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घृणास्पद कृत्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत आरोपीला जन्मठेप व ५ हजार रुपये दंड, भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४(२)(f) अन्वये १५ वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड, तसेच कलम ३५१(३) अन्वये ५ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंडाची सक्त शिक्षा ठोठावली. या प्रकरणाचा अत्यंत प्रभावी तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले यांनी केला होता.
दुसऱ्या एका प्रकरणात (गुन्हा क्र. ३३/२०२४), १२ एप्रिल २०२४ रोजी मध्यरात्री प्रतापगड येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी झोपेत असताना आरोपीने तिच्या घरात अनधिकृत घुसखोरी केली. तिचा हात पकडून विनयभंग करत लैंगिक सुखाची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या गुन्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जोगदंड यांनी तपास पूर्ण करून पुरावे सादर केले होते. या प्रकरणात न्यायालयाने भादंवि कलम ४५० अन्वये ५ वर्षे, कलम ३५४, ५०६ व पोक्सो कायद्याच्या कलम ८ अंतर्गत प्रत्येकी ३ वर्षे, तसेच कलम १२ अन्वये २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
न्यायालयात सरकारी पक्षातर्फे ॲड. सतीश घोडे व ॲड. चुटे यांनी भक्कम युक्तिवाद केला, तर केशोरी पोलीस ठाण्याच्या कोर्ट पैरवी अधिकारी महिला पोलीस शिपाई पुनम ठाकरे यांनी न्यायालयीन प्रक्रियेत अत्यंत चोख भूमिका बजावली. दोन्ही खटल्यांचा निकाल एकाच दिवशी २३ ऑक्टोबर रोजी लागल्याने कायदा आणि न्यायावरचा जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
पोलिसांनी सादर केलेल्या भक्कम पुराव्यांमुळे या विकृत आरोपीला गजाआड करण्यात मोठे यश आले असून, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश तटकरे आणि केशोरीचे ठाणेदार सपोनि चेतन ढेकणे यांनी तपास पथकाचे विशेष कौतुक केले आहे. समाजकंटक आणि अबलांवर अत्याचार करणाऱ्या विकृतांना या निकालाने सज्जड चपराक बसली आहे.

