दीड वर्षात १०२ स्कूल बसांवर कारवाई; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
३२४ बसची तपासणी; ७.२१ लाखांचा दंड वसूल
फिटनेस प्रमाणपत्र न घेतलेल्या बस विद्यार्थ्यांच्या सेवेत
गोंदिया : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित व्हावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅनविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. १ एप्रिल २०२५ ते ३० सप्टेंबर २०२६ या दीड वर्षाच्या कालावधीत ३२४ वाहनांची तपासणी करण्यात आली. यापैकी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १०२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ७ लाख २१ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, गोंदिया शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ५३२ स्कूल बसची नोंदणी असताना अनेक बसनी अद्याप अनिवार्य फिटनेस प्रमाणपत्र घेतले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
राज्यात स्कूल बसच्या अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत शालेय वाहनांची तांत्रिक स्थिती योग्य असणे आणि वाहतूक नियमांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, गोंदिया शहरात नोंदणीकृत असलेल्या अनेक स्कूल बसनी निर्धारित प्रक्रियेनुसार फिटनेस प्रमाणपत्र घेतले नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, यापैकी काही बसमधून नियमितपणे विद्यार्थ्यांची ने-आण केली जात असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांकडून तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
फिटनेस तपासणी नियमतः बंधनकारक
न्यायालयाचे आदेश आणि परिवहन विभागाच्या निर्देशांनुसार, विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्कूल बस व व्हॅनची वाहन योग्यता दरवर्षी तपासणे बंधनकारक आहे. उन्हाळी सुटीच्या काळातही या वाहनांची पुन्हा फिटनेस तपासणी करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनांची तांत्रिक स्थिती तपासून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित करणे, हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे.
या पार्श्वभूमीवर गोंदिया आरटीओ कार्यालयाने एप्रिल २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविली. यामध्ये ३२४ स्कूल बस व व्हॅनची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १०२ वाहनांवर कारवाई करून ७ लाख २१ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र, नोंदणीकृत ५३२ बसच्या तुलनेत तपासणी झालेल्या वाहनांची संख्या आणि फिटनेस प्रमाणपत्र न घेतलेल्या बसचा प्रश्न लक्षात घेता, नियमित कडक तपासणीची गरज अधोरेखित होत आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन, बसमालक, चालक आणि संबंधित प्रशासनाची आहे. वाहनांची फिटनेस तपासणी वेळेत करून घेणे, आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. फिटनेस प्रमाणपत्राशिवाय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमुळे संभाव्य अपघातांचा धोका वाढू शकतो.
………प्रतिक्रिया……
नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
“शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळा प्रशासन, बसचालक आणि वाहनमालकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून कारवाई सुरू असून, आगामी काळात ही मोहीम अधिक कठोरपणे राबविण्यात येईल.”
— विलास चौधरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया

