गोंदियात ४० लाखांची घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश !
एलसीबीने इंदूरमध्ये छापा टाकून जप्त केले २६ तोळे सोने
आरोपी फरार, सासूकडून दागिने हस्तगत!
गोंदिया : गोंदिया शहरात खळबळ माजविणाऱ्या हायप्रोफाइल ४० लाख रुपयांच्या घरफोडीचा गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या काही दिवसांत छडा लावत आंतरराज्यीय गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथे धडक छापा टाकून पोलिसांनी चक्क काळ्या रंगाच्या गोधडीत लपवून ठेवलेले तब्बल २६ तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचा शिक्का असा तब्बल ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच मुख्य आरोपी पसार झाला असून, पोलिसांनी चोरीचा माल लपवून ठेवणाऱ्या आरोपीच्या सासूच्या घरातून हा सर्व ऐवज हस्तगत केला आहे.
सिव्हिल लाईन, रविशंकर वार्ड परिसरातील रहिवासी अमोल श्रीराम मुंगमोडे हे १४ ते १५ ऑक्टोबरदरम्यान कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली होती. याप्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०५(ए), ३३१(२), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल होताच शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेला तपासाची चक्रे फिरवण्याचे निर्देश दिले. घटनास्थळी फॉरेन्सिक (FSL), फिंगरप्रिंट आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. तांत्रिक पुराव्यांची सूक्ष्म तपासणी केली असता, ही आंतरराज्यीय घरफोडी राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील कुख्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार लाखन सिंग प्रताप सिंग (रा. बेदवास, प्रतापनगर, जि. उदयपूर) याने केल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान आरोपी हा मध्य प्रदेशातील इंदूर येथील ग्राम-देव-गुराडी येथे आपल्या सासुरवाडीत लपून बसल्याची खात्रीशीर माहिती एलसीबीला मिळाली.
माहिती मिळताच एलसीबीचे पथक स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन इंदूरला धडकले आणि आरोपीच्या सासरच्या घरावर अचानक छापा टाकला. पोलिसांचा ताफा घराभोवती पाहून शातिर आरोपी लाखन सिंग आधीच पसार झाला. मात्र, पोलिसांनी पंचांसमक्ष घराची कसून झडती घेतली असता एका काळ्या गोधडीत गुंडाळून ठेवलेले २६ तोळे सोन्याचे दागिने व चांदीचा शिक्का असा ४० लाखांचा मुद्देमाल सापडला. आरोपी लाखन हरपाल सिंग आणि दिलीप हरनाम सिंग यांनी हे दागिने सासू बलवीर कौर सिंग हिच्याकडे लपवण्यासाठी दिल्याचा धक्कादायक खुलासा आरोपीच्या नातेवाईकांनी केला. पोलिसांनी सासूकडून हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला आहे.
ही धाडसी व उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, सपोनि अमरदीप खाडे, सपोनि अभिषेक जंगमवार, सफौ राजेंद्र मिश्रा, पोहवा महेश मेहर, दुर्गेश तिवारी, प्रकाश गायधने, इंद्रजित बिसेन, पोना शैलेश निनावे, पोशि हंसराज भांडारकर, कुणाल बारेवार, सुनिळ डहाके, राकेश इंदुरकर, निखिल मेश्राम, चापोशि इम्रान सैय्यद तसेच सपोनि दुरसेलवार, पोहवा रितेश लिल्हारे, राजु डोंगरे, रवि सहारे व कल्पेश चव्हाण यांनी पार पाडली. इंदूरमधून चोरीचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर आता पसार झालेल्या मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी जंग-जंग पछाडले आहे.

