LatestNewsगोंदियाविदर्भ

माजी सैनिकाच्या जमिनीच्या ठरावासाठी लाच मागणारी ग्रामसेविका व पती एसीबीच्या जाळ्यात!

सरपंच-सदस्यांच्या नावे ५.५० लाख तर स्वतःसाठी १ लाखांची मागणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गोंदिया :
शासनाकडून माजी सैनिकाला शेतजमीन मंजूर करून घेण्यासाठी ग्रामपंचायतीचा ना-हरकत दाखला (NOC) व ठराव देण्याच्या मोबदल्यात सरपंच व सदस्यांच्या नावावर साडेपाच लाख आणि स्वतःसाठी १ लाख अशा तब्बल साडेसहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपयांची लाच घेताना मानेगावच्या ग्रामसेविका आणि त्यांच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजी छोटा गोंदिया येथील राहत्या घरी ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हाभरातील शासकीय यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे.
श्रीमती उषा जयकृष्ण पाटील (वय ४२, रा. राधाकृष्ण कॉलनी, छोटा गोंदिया; पद – ग्रामसेवक, मानेगाव, ता. आमगाव) आणि त्यांचे पती रमाकांत ग्यानीराम मोटघरे (वय ५४, पद – विषय साधन व्यक्ती, गृह साधन केंद्र, पं. स. सालेकसा) अशी लाचखोर दाम्पत्याची नावे आहेत.
माजी सैनिकाकडे मागितली ६.५० लाखांची लाच
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे ४८ वर्षीय सेवानिवृत्त सैनिक आहेत. शासनाच्या नियमानुसार माजी सैनिक कोट्यातून पाच एकर शेती मिळण्याकरिता त्यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे रीतसर प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावासाठी मौजा मानेगाव ग्रामपंचायतीचा ठराव आणि ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) आवश्यक होते. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी तक्रारदाराने ग्रामसेविका उषा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे नाव पुढे करून त्यांच्यासाठी ५ लाख ५० हजार रुपये आणि प्रत्यक्ष कामाची फाईल पुढे सरकवण्यासाठी स्वतःकरिता वेगळे १ लाख रुपये अशा एकूण ६ लाख ५० हजार रुपयांच्या भल्यामोठ्या लाचेची मागणी केली.
घरी बोलावून घेतली लाचेची रक्कम; पती-पत्नी रंगेहाथ अटकेत
तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी गोंदिया एसीबी कार्यालयात धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने ९ ऑक्टोबर रोजीच पंचांसमक्ष व्हाईस रेकॉर्डरच्या साहाय्याने लाच मागणीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान ग्रामसेविकेने लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून स्वतःकरिता मागितलेला १ लाख रुपयांचा पहिला हप्ता १२ किंवा १३ ऑक्टोबर रोजी छोटा गोंदिया येथील राहत्या घरी आणून देण्यास सांगितले.
त्यानुसार, मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी एसीबीने सापळा रचला. तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन आरोपींच्या घरी पोहोचले असता, ग्रामसेविका उषा पाटील यांनी केलेल्या इशाऱ्यावरून त्यांचे पती रमाकांत मोटघरे यांनी तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची रोकड स्वीकारली. त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदियाचे पोलीस उपअधीक्षक नीलेश लोधी, पोलीस निरीक्षक अरविंद राऊत (सापळा अधिकारी), पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, अंमलदार बोहरे, कहालकर, शेंडे, बोपचे, काटकर, सोनवणे, बाटबर्वे, पटले आणि डांगे यांनी केली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *