LatestNewsगोंदियाविदर्भ

समृद्धी महामार्ग ते थेट विमानसेवेपर्यंत खा. प्रफुल्ल पटेलांनी मांडला गोंदियाच्या विकासाचा ‘रोडमॅप’!

दिवाळीपर्यंत बिरसी विमानतळावरून नवी मुंबईसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
शहराच्या वाहतूक कोंडीतून मुक्तीसाठी रेल्वे मालधक्का हिरडामाली येथे हलवणार; २ लाखांपर्यंतची कर्जमाफी अन् बोनसवर लवकरच निर्णय
गोंदिया :
गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, हवाई आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीला गती देण्यासोबतच बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याची ग्वाही माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. रामनगर येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी गोंदिया जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा सविस्तर ‘रोडमॅप’ जाहीर केला.
मुंबई-नागपूर-गोंदिया समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू असल्याचे नमूद करत खासदार पटेल म्हणाले की, “हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर केवळ गोंदिया शहरालाच नव्हे, तर लगतच्या बालाघाट, आमगाव, देवरी आणि कोहमारा परिसरालाही मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांशी थेट, गतिमान आणि सुरक्षित कनेक्टिव्हिटी मिळेल. हा महामार्ग संपूर्ण परिसराच्या व्यापार, उद्योग आणि आर्थिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.”
बिरसी विमानतळावरून दिवाळीपर्यंत नवी मुंबईसाठी उड्डाण!
बिरसी विमानतळावरील बंद पडलेली प्रवासी विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व स्तरांवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी गोंदिया-हैदराबाद मार्गावर अपेक्षित प्रवासी संख्या न मिळाल्याने ही सेवा प्रभावित झाली होती. मात्र, आता प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन आगामी दिवाळीपर्यंत गोंदिया ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू करण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे खा. पटेल यांनी स्पष्ट केले.
रेल्वे मालधक्का हिरडामाली येथे हलवणार; भीमनगर उड्डाणपुलाला गती!
शहरातील वाहतूक समस्या व रेल्वे प्रकल्पांबाबत बोलताना खा. पटेल यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या:
रेल्वे समितीवर नियुक्ती: खासदार राजेंद्र जैन यांची संसदेच्या रेल्वे समितीवर निवड झाल्यामुळे विदर्भ आणि विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे समस्या तातडीने मार्गी लावणे सोपे होणार आहे.
वाहतूक कोंडीतून मुक्ती: गोंदिया शहराच्या उत्तर भागातील दैनंदिन वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सध्याचा मुख्य रेल्वे मालधक्का हिरडामाली रेल्वे स्थानकाजवळ हलवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
भीमनगर उड्डाणपूल: भीमनगर रेल्वे चौकी परिसरातील वाहतुकीची कोंडी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाबाबत प्रशासकीय पातळीवर सकारात्मक पावले उचलली जात आहेत.
२ लाखांपर्यंत कर्जमाफी आणि बोनसवर लवकरच निर्णय!
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर बोलताना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि धानाचा बोनस देण्याच्या मुद्द्यावर सरकार लवकरच ठोस भूमिका जाहीर करेल. यासंदर्भात शासनस्तरावर अतिशय सकारात्मक प्रक्रिया सुरू असून लवकरच शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *