विश्रांतवाडी, धानोरीतील अवैध धंदे व गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करा; शिवसेनेचे पोलीस उपआयुक्तांना निवेदन!
मटका, गांजा, बेकायदेशीर दारूविक्री व लॉजेस तातडीने बंद करण्याची मागणी
पुणे : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील विश्रांतवाडी आणि धानोरी परिसरात फोफावलेले अवैध धंदे आणि गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी तात्काळ व नियमित कारवाई करून हा संपूर्ण परिसर भयमुक्त करावा, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ४) रजनीकांत यांना नुकतेच लेखी निवेदन सादर करून ठोस पावले उचलण्याचे साकडे घातले.
निवेदनानुसार, विश्रांतवाडी व धानोरी परिसरात सध्या मटका, बेकायदेशीर दारूविक्री, प्रतिबंधित गुटखा तसेच गांजा आणि ब्राऊन शुगरसारख्या जीवघेण्या अंमली पदार्थांची विक्री उघडपणे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय अनधिकृत बार आणि बेकायदेशीर लॉजेसमुळे या भागातील गुन्हेगारीत चिंताजनक वाढ झाली आहे. परिसरातील विविध चौक आणि आडोशाच्या ठिकाणी समाजकंटक व गुंडांचे टोळके उघडपणे अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळून येतात. यामुळे स्थानिक नागरिक, विशेषतः महिला, तरुणी आणि शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असुरक्षिततेचे व भीतीचे वातावरण पसरले आहे. रस्त्यावरून चालणेही महिलांसाठी धोक्याचे बनले असून, अशा उपद्रवी घटकांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिसर भयमुक्त करण्याची मागणी
परिसरातील शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे वैयक्तिक लक्ष द्यावे. सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करावेत, बेकायदेशीर लॉजेस व बारवर कठोर कारवाई करावी आणि चौकाचौकांत ठिय्या मांडणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सातत्याने कोम्बिंग ऑपरेशन व गस्त सुरू ठेवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हे निवेदन सादर करताना शिवसेनेचे पुणे शहर समन्वयक शंकर संगम, विभागप्रमुख शाम सहदेव ताठे, प्रभाकर ठाकरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

