LatestNewsगोंदियाविदर्भ

शाळकरी मुलांची बस झाडावर आदळली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली!

तिरोडा-गोंदिया मार्गावर अपघात : श्रीनगरच्या मानवता विद्यालयाची घटना; काही विद्यार्थी व चालक किरकोळ जखमी
गोंदिया/तिरोडा :
विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळल्याची घटना तिरोडा-गोंदिया मार्गावर घडली. हा अपघात डोंगरगाव ते सुखदेव टोलीदरम्यान घडला. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, काही शाळकरी विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून चालकही जखमी झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, गोंदिया शहरातील श्रीनगर येथील मानवता पूर्व माध्यमिक विद्यालयाची स्कूल बस विद्यार्थ्यांची ने-आण करत असताना तिरोडा-गोंदिया मार्गावरून जात होती. डोंगरगाव आणि सुखदेव टोली दरम्यान अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली.
विद्यार्थ्यांमध्ये घबराट; किरकोळ जखमींवर प्रथमोपचार
बस झाडावर आदळताच जोरदार आवाजाने परिसरात खळबळ उडाली आणि बसमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण होऊन त्यांनी आरडाओरड सुरू केली. अपघातात बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले असून, बसचालक तसेच काही विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला आहे. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक परिसरातील नागरिकांनी व प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मुलांना सुखरूप बाहेर काढले. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि चालकाला तातडीने जवळच्या रुग्णालयात प्रथमोपचारासाठी हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पालकांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली होती. सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे समजताच पालकांसह प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *