LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

नक्षल प्रोत्साहन भत्त्याच्या बिलासाठी ७ हजारांची लाच घेताना जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक रंगेहात जाळ्यात; लिपिकासह दोघांना घेतले ताब्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाची धडक कारवाई; गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
गोंदिया : दिवंगत पित्याच्या नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे थकीत (एरिअर्स) बिल मंजूर करून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने सोमवारी रंगेहात पकडले. या कारवाईत लाच स्वीकारणारा आरोग्य सेवक व लाच मागणीस प्रोत्साहन देणारा वरिष्ठ लिपिक अशा दोघांना एसीबीने ताब्यात घेतले असून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मारुती यादव दिपेवाड (वय ३९, आरोग्य सेवक, जिल्हा हिवताप कार्यालय गोंदिया, रा. हरफड, ता. माहूर, जि. नांदेड, हल्ली मुक्काम पारधी हाऊस, न्यू लक्ष्मीनगर, गोंदिया) आणि नीरजकुमार नरेश अग्रवाल (वय ४०, वरिष्ठ लिपिक, रा. मारोती अपार्टमेंट, अंगूर बगीचा रोड, गोंदिया) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदाराचे (वय ४३) वडील हे जिल्हा हिवताप विभागात आरोग्य सेवक पदावर कार्यरत होते. सन २०१६ मध्ये ते नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर आईच्या कौटुंबिक निवृत्तीवेतनाच्या चौकशीसाठी तक्रारदार मार्च २०२६ मध्ये हिवताप कार्यालयात गेले असता वरिष्ठ लिपिक नीरजकुमार अग्रवाल याने वडिलांचे नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे थकीत बिल काढून देण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच मागितली.
त्यानंतर काम न झाल्याने जून २०२६ मध्ये तक्रारदार पुन्हा गेले असता अग्रवाल याने आरोग्य सेवक मारुती दिपेवाड याच्याकडे पाठवले. दिपेवाड याने हे बिल मंजूर करण्यासाठी थेट ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. २१ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने विचारणा केली असता दिपेवाड आपल्या मागणीवर ठाम राहिला.
अशी झाली कारवाई
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २४ ऑगस्ट रोजी गोंदिया एसीबी कार्यालयात धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने कार्यालयात पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता, मारुती दिपेवाड याने ७ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले; तर लिपिक अग्रवाल याने त्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर सोमवारी जिल्हा हिवताप कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताच मारुती दिपेवाड याला पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. यावेळी उपस्थित वरिष्ठ लिपिक नीरजकुमार अग्रवाल यालाही पथकाने ताब्यात घेतले.
ही यशस्वी कारवाई एसीबी नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया एसीबीचे पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, उमाकांत उगले, सहायक उपनिरीक्षक करपे, पोलीस हवालदार बोहरे, कहालकर, अंमलदार शेंडे, बोपचे, कापसे, काटकर, सोनवणे, बाटबर्वे, महिला अंमलदार पटले व डांगे यांनी केली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *