दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक; ३ तरुणांचा जागीच मृत्यू, १ गंभीर
गोंदिया–कोहमारा मार्गावरील गणखैराजवळ मध्यरात्रीची दुर्घटना गोरेगाव व सोनी परिसरात पसरली शोककळा
गोरेगाव : गोंदिया–कोहमारा मार्गावरील गणखैरा शिवारात बुधवारी मध्यरात्री दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा भीषण अपघात ३० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास घडला. अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पियुष योगेश बारेवार (वय २४, रा. गोरेगाव), मनोज मधुकर कुरंजेकर (वय २६, रा. सोनी, ता. गोरेगाव) आणि विनय धना कोहरे (वय २७, रा. सोनी, ता. गोरेगाव) यांचा समावेश आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे गोरेगाव आणि सोनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, गोंदिया–कोहमारा मार्गावरून जात असलेल्या दोन दुचाकींची गणखैरा गावाजवळ मध्यरात्री १२ च्या सुमारास अत्यंत जोरदार समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि दुचाकीस्वार तरुण रस्त्यावर फेकले गेले. अपघाताचा भीषण आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.
तिघांचा जागीच मृत्यू; एकावर उपचार सुरू
या अपघातात दुचाकीवरील तिघांचा गंभीर दुखापतींमुळे जागीच तडफडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पियुष योगेश बारेवार (वय २४, रा. गोरेगाव), मनोज मधुकर कुरंजेकर (वय २६, रा. सोनी, ता. गोरेगाव) आणि विनय धना कोहरे (वय २७, रा. सोनी, ता. गोरेगाव) यांचा समावेश आहे. तिन्ही तरुण ऐन उमेदीच्या वयात काळाच्या पडद्याआड गेल्याने गोरेगाव व सोनी गावात शोककळा पसरली आहे.
या अपघातात रॉकी मानकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक नागरिकांच्या व पोलिसांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात एमएच-३५/एवाय-४०७० आणि एमएच-३५/एवाय-८९६३ या दोन क्रमांकाच्या दुचाकींचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.

