धावत्या स्कूल व्हॅनचा अचानक दरवाजा उघडला; शाळकरी मुले महामार्गावर फेकली गेली
खजरी येथे मोठा अनर्थ टळला : डुग्गीपार पोलिसांकडून वाहन जप्त
ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वाचले बालकांचे प्राण;
सडक अर्जुनी (गोंदिया ) : शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन घराकडे निघालेल्या एका धावत्या ओम्नी व्हॅनचा मागील दरवाजा अचानक उघडल्याने वाहनातील निष्पाप शाळकरी मुले थेट राज्य महामार्गावर फेकली गेल्याची थरारक घटना तालुक्यातील खजरी येथे शुक्रवारी घडली. या दुर्घटनेत एका बालकाच्या डोक्याला दुखापत झाली असून, प्रसंगावधान राखत स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतल्याने महामार्गावर होणारा मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे पालकांमध्ये शालेय वाहतुकीच्या सुरक्षेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी येथील ‘लिटल एंजल पब्लिक स्कूल’मध्ये खजरी परिसरासह मसवानी, खोडशिवणी व बोथली भागातील चिमुकले विद्यार्थी शिक्षण घेतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी आणि एका शिक्षिकेला घेऊन ओम्नी व्हॅन (क्रमांक एमएच ३५ – ई १८०८) विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी निघाली होती. हे वाहन गोंदिया-कोहमारा राज्य महामार्ग क्रमांक ७५३ वरून वेगाने जात असतानाच, खजरी गावाजवळ अचानक व्हॅनचा मागील दरवाजा लॉक न झाल्यामुळे उघडला गेला. वाहन वेगात असल्याने तोल जाऊन वाहनातील काही लहान मुले थेट डांबरी रस्त्यावर फेकली गेली.
नागरिकांची समयसूचकता, वाहतूक थांबवली
भरधाव महामार्गावर मुले फेकली गेल्याचे पाहताच परिसरात प्रचंड गोंधळ व आरडाओरड झाली. खजरी गावातील स्थानिक नागरिकांनी व रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी तातडीने महामार्गावरील वाहतूक थांबवून जखमी मुलांना सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजूला केले. या अपघातात एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला तात्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. महामार्गावर भरधाव येणारी अवजड वाहने वेळेत थांबल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त ओम्नी व्हॅन ताब्यात घेतली असून वाहनचालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी, क्षमता आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जाते की नाही, असा संतप्त सवाल आता पालक व नागरिकांमधून विचारला जात आहे.

