खासदार प्रफुल पटेल, खा.राजेंद्र जैन यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट; गोंदिया-मुंबई ‘वंदे भारत’ सुरू करण्याची मागणी!
भंडारा, तुमसर, तिरोडा, आमगाव, सालेकसा येथे विविध गाड्यांच्या थांब्यांसाठी साकडे : भूसंपादनाचा योग्य मोबदला व तिरोडा स्थानकाचा ‘अमृत भारत’मध्ये समावेशावर भरनवी
दिल्ली/गोंदिया : गोंदिया व भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित समस्या, नवीन रेल्वे सुविधा आणि विकासात्मक कामांसंदर्भात ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल आणि खासदार राजेंद्र जैन यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत गोंदिया-मुंबई थेट ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्यासह परिसरातील विविध रेल्वे स्थानकांवर महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबे देण्याची आग्रही मागणी करण्यात आली. या वेळी खासदार राजेंद्र जैन यांनी रेल्वेमंत्र्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सुपूर्द केले.नवी दिल्लीतील रेल भवनात पार पडलेल्या या बैठकीत गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील प्रवासी, व्यापारी, शेतकरी व विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अडचणींचा पाढा रेल्वेमंत्र्यांसमोर वाचण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोन्ही खासदारांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत या सर्व जनहितार्थ मागण्यांवर सकारात्मक व तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. गोंदिया-मुंबई ‘वंदे भारत’ व नवीन थांबे जिल्हावासीयांना राज्याची राजधानी मुंबई येथे जलद गतीने पोहोचता यावे, यासाठी बहुप्रतिक्षित ‘गोंदिया-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस’ तातडीने सुरू करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. याव्यतिरिक्त सालेकसा रेल्वे स्थानकावर इंटरसिटी एक्सप्रेसला तात्काळ थांबा देण्यासह भंडारा, तुमसर, तिरोडा, आमगाव व सालेकसा या स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक त्या एक्सप्रेस गाड्यांचे थांबे मंजूर करण्याची मागणी लावून धरण्यात आली.गोंदियात रेल्वे मेंटेनन्स डेपो गोंदिया हे मध्य भारतातील अत्यंत महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असल्याने येथे रेल्वे गाड्यांच्या देखभालीसाठी (कोचिंग मेंटेनन्स व पिट लाईन) आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर बैठकीत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.भूसंपादनाचा योग्य व न्याय्य मोबदला :परिसरात नव्याने सुरू असलेल्या रेल्वे लाईन्स (उदा. गुदमा-प्रताप बाग) व इतर रेल्वे विकास प्रकल्पांसाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जमिनींच्या बदल्यात बाधित शेतकरी, भू-मालक व प्लॉटधारकांना बाजारभावानुसार उचित, योग्य व न्यायसंगत मोबदला प्रदान करण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची बाजू खासदारांनी मांडली.तिरोडाचा ‘अमृत भारत योजने’त समावेश करा परिसरातील प्रवाशांची वाढती वर्दळ आणि औद्योगिक महत्त्व लक्षात घेता तिरोडा रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी त्याचा केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘अमृत भारत स्टेशन योजने’मध्ये तातडीने समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली.

